राष्ट्रीय

मुंबईतील आझाद मैदानावर विद्यार्थ्यांचे आंदोलन; सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा

20 जुलै रोजी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जंतर- मंतरहून संसदेपर्यंत मोर्चा

मुंबई, दिनेश बोधिराज : दिल्लीतील जंतर-मंतर येथे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदान येथे कॉकरोच जनता पार्टी आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मुंबईसह राज्यातील विविध भागांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांवर सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारच्या शिक्षण धोरणाविरोधात तसेच परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटी, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पथनाट्य, घोषणाबाजी, गीते, बॅनर प्रदर्शन आणि विविध सांस्कृतिक माध्यमांतून विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त करत पारदर्शक, न्याय्य आणि विद्यार्थीहिताचे शिक्षण धोरण राबविण्याची मागणी केली.आंदोलनकर्त्यांनी परीक्षा प्रक्रियेत प्रामाणिकपणा व पारदर्शकता सुनिश्चित करावी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावेत आणि सोनम वांगचुक यांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी केली.आंदोलनानंतर विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ मंत्रालयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, दोन्ही नेत्यांची भेट न झाल्याने राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन त्यांचे निवेदन स्वीकारल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी घोषणा केली की, २० जुलै रोजी देशभरातील तसेच जगभरातील विद्यार्थी मोठ्या संख्येने दिल्लीतील जंतर-मंतर येथे एकत्र येऊन सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत. दिवसभर आझाद मैदान परिसर घोषणांनी दुमदुमून गेला. विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत शिक्षणाशी संबंधित प्रश्नांवर सरकारने तातडीने ठोस निर्णय घ्यावेत, अशी जोरदार मागणी केली.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button