महाराष्ट्र

शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे उभारण्यात आलेल्या अनधिकृत बेकायदेशीर व्यवसायिक साम्राज्यावर अखेर प्रशासनाचा बुलडोझर फिरला

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या संयुक्त धडक कारवाईत मानखुर्द येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली

BMC bulldozer action Mumbai

आम्ही भारतीय, साप्ताहिक / डिजिटल / दिनेश बोधिराज : मानखुर्द मध्ये गोडाऊन, गाळे व हॉटेलसह ५०हून अधिक अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा बुलडोझर आणि तोडक कारवाई केल्याने अतिक्रमण कर्त्यांमध्ये खळबळ उडाली. मानखुर्द परिसरातील टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिनीखाली शासकीय जमिनीवर वर्षानुवर्षे बेकायदेशीरपणे भले मोठे गोडाऊन उभारण्यात आले होते. यामधील गोडाऊन, व्यावसायिक गाळे, हॉटेल आणि इतर अनधिकृत बांधकामांवर गुरुवारी अखेर प्रशासनाचा बुलडोझर फिरविला.

जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांच्या आदेशानुसार राबविण्यात आलेल्या संयुक्त धडक कारवाईत तब्बल ५० हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून शासकीय जागा बळकावून सुरू असलेल्या व्यावसायिक साम्राज्यावर प्रशासनाने तोडक कारवाई करत अनाधिकृत बांधकामे जमीनदोस्त केली. सायन – पनवेल मुख्य महामार्गालगत ट्रॉम्बे वाहतूक चौकीच्या समोरील टाटा पॉवरच्या उच्चदाब वीजवाहिनीखालील शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात गोडाऊन, गाळे, हॉटेल आणि अन्य व्यावसायिक बांधकामे उभारून सर्रास व्यवसाय सुरू होते. व्यवसायिक गाळे उभारून भूमाफिया प्रत्येक गाळ्याकडून लाखो रुपये भाडे उकळत होते. दोन महिन्यापूर्वी एक कोटीला गाळा विकत घेऊन त्या ठिकाणी हॉटेल उभारण्यात आले होते. मोठ्या प्रमाणात अनधिकृत गाळे निर्माण करणाऱ्या या बांधकामांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची चर्चा असतानाच जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी कठोर भूमिका घेत संयुक्त अतिक्रमण निष्कासन मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण), उपजिल्हाधिकारी (अतिक्रमण), उपविभागीय अधिकारी, कुर्लाविभाग, तहसीलदार, कुर्ला, महसूल विभागाचे अधिकारी तसेच पोलीस विभागाच्या कडेकोट बंदोबस्तात जेसीबी आणि अन्य यंत्रसामग्रीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. दिवसभर चाललेल्या या मोहिमेत एकामागोमाग एक गोडाऊन, गाळे, हॉटेल आणि इतर अनधिकृत संरचना पाडण्यात आल्या. कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे. शासकीय जमिनीचे संरक्षण, धोकादायक व बेकायदा बांधकामांवर आळा आणि शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून व्यवसाय थाटणाऱ्यांना कोणतीही मुभा दिली जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा या कारवाईतून प्रशासनाने दिला आहे. शासकीय जमिनीचे संरक्षण, धोकादायक व बेकायदा बांधकामांवर आळा आणि अतिक्रमणमुक्तीची मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मानखुर्द मधील या धडक कारवाईमुळे अनधिकृत बांधकामांच्या माध्यमातून व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, परिसरात दिवसभर या कारवाईची चर्चा सुरू होती.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!