आमच्याबद्दल
‘आम्ही भारतीय’ साप्ताहिकाची यशस्वी ५ वर्षांची वाटचाल
आपल्या हक्काच्या ‘आम्ही भारतीय’ साप्ताहिकाने आज यशस्वीपणे पाच वर्षांचा टप्पा पूर्ण केला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषेतून चिकित्सक, विश्लेषणात्मक आणि परिवर्तनवादी विचार पोहोचवण्याचा हा प्रवास आपल्या अमूल्य सहकार्याशिवाय शक्य झाला नसता.
गेल्या पाच वर्षांत आमच्या प्रत्येक अंकावर आपण दाखवलेला अथांग विश्वास, दिलेले प्रेम आणि वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शक सूचना यांमुळेच आम्ही आज या यशस्वी टप्प्यावर पोहोचलो आहोत. त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहोत. यापुढील काळातही सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांवर दर्जेदार, अभ्यासपूर्ण व वस्तुनिष्ठ माहिती घेऊन आम्ही अधिक जोमाने आपल्या सेवेत तत्पर राहू.
आज महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात संविधानिक मूल्यांपुढे अनेक आव्हाने उभी राहताना दिसत आहेत. लोकशाही संस्थांचे महत्त्व कमी करण्याचे, सामाजिक ऐक्याला तडे देण्याचे आणि जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्याचे विविध प्रयत्न होत असल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे शिक्षण, रोजगार, शेती आणि शेतकरी यांच्याशी संबंधित गंभीर समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहेत.
या सर्व प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्याविषयी चिकित्सक व वस्तुनिष्ठ विश्लेषण समाजापर्यंत पोहोचवण्याचे कार्य ‘आम्ही भारतीय’ साप्ताहिक सातत्याने करत राहील. या कार्यासाठी देशातील सर्व बुद्धिजीवी, अभ्यासक, लेखक आणि विचारवंतांनी आम्हाला साथ व सहकार्य द्यावे, ही नम्र अपेक्षा आहे.
आजवर अनेकदा खरा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला नाही. परिणामी अनेक महापुरुषांच्या कार्याचा आणि विचारांचा विपर्यास झालेला दिसून येतो. इतिहासाचा चिकित्सक अभ्यास, सत्याचा शोध आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांवर आधारित माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहील.
महाराष्ट्रातील तसेच भारतातील महापुरुषांचा खरा इतिहास, त्यांचे क्रांतिकारी विचार आणि सामाजिक योगदान नव्या पिढीसमोर मांडून तरुणांना प्रेरित करण्याचे कार्य आम्ही अधिक व्यापक स्वरूपात करू. त्याचबरोबर नैतिक मूल्यांची जोपासना, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि चिकित्सक बुद्धीचा विकास यांनाही आम्ही तितकेच महत्त्व देऊ.
धर्माकडे अंधश्रद्धेच्या दृष्टीने नव्हे तर नैतिकता, मानवता आणि सामाजिक कल्याणाच्या दृष्टीने पाहिले जावे, असे आम्ही मानतो. समाजात वाढणाऱ्या अंधश्रद्धा, भोंदूगिरी आणि अवैज्ञानिक प्रवृत्तींविरोधात जनजागृती करणे हेही आमच्या कार्याचे महत्त्वाचे अंग राहील.
आपल्या विश्वासाच्या बळावरच आम्ही नव्या उत्साहाने पुढील वाटचाल करत आहोत. आजपर्यंत आपण वार्षिक सभासदत्व स्वीकारून आणि प्रिंट माध्यमाला भक्कम पाठबळ देऊन आम्हाला मोठे सहकार्य केले. त्याबद्दल मनःपूर्वक आभार!
येणाऱ्या काळात प्रिंट माध्यमाबरोबरच डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ‘आम्ही भारतीय’ अधिक प्रभावीपणे उपस्थित राहणार आहे. या नव्या प्रवासातही आपण असेच प्रेम, विश्वास आणि सहकार्य द्याल, अशी अपेक्षा आहे.
आमच्या साप्ताहिकाच्या डिजिटल आवृत्त्या, विशेष लेख आणि इतर महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपण ‘आम्ही भारतीय’ च्या अधिकृत संकेतस्थळाला www.aamhibharatiya.com भेट देऊ शकता.
वाचकांचे हे ऋण आमच्यावर असेच कायम राहो, हीच सदिच्छा!
आपला नम्र,
दिनेश सोमा बोधिराज
संपादक
‘आम्ही भारतीय’ साप्ताहिक