छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त राज्यस्तरीय सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद बोधी ब्लेंडेड लर्निंग आणि आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दिनांक १५ व १६ फेब्रुवारी २०२६ रोजी राज्यस्तरीय सांस्कृतिक व शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धांमध्ये चित्रकला, निबंध, वक्तृत्व, पोवाडा/गायन, रील्स मेकिंग तसेच “मी सावित्री…” (वेशभूषा व विचारमांडणी) अशा विविध स्पर्धांचा समावेश होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच पुणे, नागपूर, सोलापूर आणि औरंगाबाद येथील अनेक स्पर्धकांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून स्पर्धेत सहभाग घेतला.या स्पर्धांमध्ये अवघ्या पाच वर्षांच्या संबोधी अमर कडाळे हिने सादर केलेले “कोणी नाही केलं भलं गं माई, भीमाने केलं” हे गीत विशेष आकर्षण ठरले. तिच्या निरागस आणि प्रभावी सादरीकरणातून समता, न्याय आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश उपस्थितांपर्यंत प्रभावीपणे पोहोचला.विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे भारतातील विविध राज्यांतील अमराठी स्पर्धकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर अत्यंत अभ्यासपूर्ण निबंध आणि प्रभावी वक्तृत्व सादर करून शिवचरित्राची प्रेरणा भाषेच्या सीमा ओलांडून देशभर पोहोचत असल्याचे अधोरेखित केले.या राज्यस्तरीय स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी खारघर येथे आयोजित करण्यात आला असून, विजेत्या स्पर्धकांचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती बोधी ब्लेंडेड लर्निंगच्या संचालिका पायल कांबळे यांनी दिली.