भेसळखोरांचा जीवघेणं जाळं मोडून काढणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन! – कपिल पाटील
जनहित सर्वोच्च मानणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच सामान्य माणसाला न्यायाची आशा वाटते.

शासकीय यंत्रणांवरील लोकांचा उरलेला विश्वास तुकाराम मुंडे, जयंत मीणा आणि पवन बनसोड यांसारख्या निष्ठावान, निर्भीड आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमुळे टिकून आहे. मोहाला अन् दबावाला न जुमानता कायद्याचं राज्य आणि जनहित सर्वोच्च मानणाऱ्या अशा अधिकाऱ्यांमुळेच सामान्य माणसाला न्यायाची आशा वाटते.
लाखो शिक्षक उमेदवारांच्या आयुष्याशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या टीईटी पेपरफुटी प्रकरणातील गुन्हेगारांना भिवंडी पोलिसांनी डी.सी.पी. पवन बनसोड यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा, दिल्ली आणि बिहारमधून अटक करून मोठी कारवाई केली आहे. शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास हादरवणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश होणं महत्त्वाचं होतं.
मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी नागरिकांना ‘पेन किलर’च्या नावाखाली उंदीर मारण्याचे विषारी औषध देणाऱ्या गुन्हेगाराला डी.सी.पी. जयंत मीणा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई पोलिसांनी तात्काळ अटक केली. वेळेत हस्तक्षेप झाला नसता तर १४ हजार गोळ्यांनी शेकडो निष्पाप नागरिकांचे जीव धोक्यात आले असते.
या दोन्ही घटनांमध्ये तातडीने कारवाई करणाऱ्या पोलीस दलाचे आणि भेसळखोरांचा जीवघेणं जाळं मोडून काढणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
समाजाच्या सुरक्षिततेसाठी अशा कठोर आणि सजग कारवाया सातत्याने होत राहिल्या पाहिजेत.
– कपिल पाटील

