सुरबाना जुराँगकडे आराखड्याची जबाबदारी; ३२३.४४ चौ. किमी क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास
मुंबई ३.०चा मास्टर प्लॅन; १२४ गावांत नव्या शहराची उभारणी

आम्ही भारतीय / साप्ताहिक, मुंबई | प्रतिनिधी : वाढत्या मुंबई महानगर क्षेत्रावरील लोकसंख्या, वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा ताण कमी करण्यासाठी तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्याच्या उद्देशाने प्रस्तावित ‘मुंबई ३.०’ अर्थात ‘तिसरी मुंबई’ प्रकल्पाच्या मास्टर प्लॅनला वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा विस्तृत मास्टर प्लॅन तयार करण्याची जबाबदारी सिंगापूरस्थित सुरबाना जुराँग (Surbana Jurong) या आंतरराष्ट्रीय नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील कंपनीला देण्यात आली आहे.
‘मुंबई ३.०’ प्रकल्पात रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल आणि पेण तालुक्यांतील १२४ गावांचा समावेश असून, सुमारे ३२३.४४ चौ. किमी क्षेत्राचा नियोजनबद्ध विकास प्रस्तावित आहे. कंपनीकडून सुमारे ३० आठवड्यांच्या कालावधीत नव्या शहराचा मास्टर प्लॅन आणि व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार ही कंपनी दोन टप्प्यांत तिसऱ्या मुंबईचा आराखडा तयार करणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी कंपनीला ११.८९ कोटी रुपये, तर दुसऱ्या टप्प्याच्या कामासाठी २३.१२ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
‘मुंबई ३.०’चा विकास प्रामुख्याने जमिनीचा वापर व झोनिंग, वाहतूक व दळणवळण आणि आधुनिक पायाभूत सुविधा व शाश्वत विकास या तीन प्रमुख स्तंभांवर आधारित असेल.
तीन प्रमुख स्तंभांवर आधारित नियोजन
जमिनीचा वापर व झोनिंग : प्रस्तावित शहरात निवासी आणि व्यावसायिक क्षेत्रांचा मिश्र-वापर करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना रोजगाराच्या ठिकाणी सहज पोहोचता यावे, यासाठी निवास, रोजगार, व्यापार आणि सेवा क्षेत्रांची परस्पर सांगड घालण्यात येणार आहे. आयटी पार्क, वित्तीय केंद्रे, लॉजिस्टिक हब आणि डेटा सेंटरसाठी स्वतंत्र क्षेत्रे विकसित करण्याची संकल्पना आहे. कर्नला-साई-चिरनेर न्यू टाऊन हे या विकासाचे महत्त्वाचे आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा विचार आहे.
रेल्वे, मेट्रो, बस आणि रस्त्यांचे एकत्रित जाळे
वाहतूक व्यवस्थेत ट्रान्झिट-ओरिएंटेड डेव्हलपमेंट (TOD) संकल्पनेला महत्त्व दिले जाणार आहे. रेल्वे स्थानके, मेट्रो आणि बस टर्मिनलच्या परिसरात दाट निवासी व व्यावसायिक विकास करण्याचे नियोजन आहे. यामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवून खासगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘मुंबई ३.०’ची वाहतूक व्यवस्था अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतू, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट (JNPT) यांच्याशी जोडण्यावर भर देणार आहे. त्यासोबतच पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग सुविधांचे जाळे उभारण्याची संकल्पना आहे.
हरित आणि डिजिटल शहराचा संकल्प
नव्या शहराच्या विकासात पर्यावरणीय समतोल राखण्यावरही भर देण्यात येणार आहे. शाश्वत ऊर्जेचा वापर, २४ तास पाणीपुरवठा, आधुनिक सांडपाणी व्यवस्थापन आणि हाय-स्पीड डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
नैसर्गिक डोंगर, नद्या आणि इतर पर्यावरणीय घटकांचे संरक्षण करताना ग्रीन कॉरिडॉर, उद्याने आणि हरित क्षेत्रे विकसित करण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक विकासासोबत पर्यावरणीय शाश्वततेचा समतोल साधण्याचे आव्हान या प्रकल्पासमोर असेल.
३० आठवड्यांत आराखडा तयार होणार
‘तिसऱ्या मुंबई’कडून मोठ्या आर्थिक अपेक्षा
सुरबाना जुराँगकडून मास्टर प्लॅन तयार करण्याचे काम विविध टप्प्यांत केले जाणार आहे. सुरुवातीला इन्सेप्शन प्लॅन तयार करून नियोजनाची दिशा निश्चित केली जाईल. त्यानंतर जमिनीचा सध्याचा वापर, लोकसंख्या, भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध पायाभूत सुविधांचा सविस्तर अभ्यास केला जाणार आहे.
यानंतर भविष्यातील शहराचे स्वरूप निश्चित करणारे व्हिजन डॉक्युमेंट, त्यानंतर कन्सेप्ट लँड यूज प्लॅन तयार केला जाईल. अंतिम टप्प्यात स्थानिक नागरिक, उद्योग, विविध भागधारक आणि सरकारी यंत्रणांशी चर्चा करून अंतिम आराखडा तयार केला जाणार आहे.
नवी मुंबई विमानतळ, अटल सेतू, जेएनपीटी आणि प्रस्तावित नव्या शहरी विकासामुळे रायगड परिसराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. मुंबई महानगर प्रदेशाला भविष्यात जागतिक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या व्यापक उद्दिष्टात ‘मुंबई ३.०’ प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
मात्र, १२४ गावांमध्ये होणाऱ्या मोठ्या प्रमाणातील शहरीकरणामुळे स्थानिक नागरिकांचे पुनर्वसन, जमीन संपादन, पर्यावरण संरक्षण, शेती आणि स्थानिक रोजगार यांसारखे प्रश्नही महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यामुळे केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापेक्षा स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि पर्यावरणीय समतोल राखून हा विकास झाला तरच ‘तिसरी मुंबई’ खऱ्या अर्थाने शाश्वत आणि लोकाभिमुख शहर ठरेल.




