९० हजार कोटींच्या थकीत बिलांसाठी कंत्राटदार आझाद मैदानात; रोहित पवारांचा आंदोलनाला पाठिंबा
गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात

आम्ही भारतीय, साप्ताहिक
मुंबई | प्रतिनिधी
राज्य सरकारकडून कंत्राटदारांची सुमारे ९० हजार कोटी रुपयांची बिले थकीत असल्याचा आरोप करत राज्यभरातील शेकडो कंत्राटदारांनी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू केले आहे. गेल्या तीन ते आठ वर्षांपासून बिले प्रलंबित असल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात सापडले असून अनेकजण कर्जबाजारी झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. थकीत बिलांमुळे आर्थिक अडचणी वाढून काही कंत्राटदारांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचेही आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. शासनाकडून वेळोवेळी आश्वासने मिळूनही प्रत्यक्षात थकीत रकमेचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कंत्राटदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या प्रश्नासंदर्भात संबंधित मंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तसेच विधानसभा अधिवेशनात सभागृहातही थकीत बिलांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मात्र, त्यानंतरही शासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून राज्यभरातील कंत्राटदारांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होत कंत्राटदारांना पाठिंबा दिला. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या जाणून घेत सरकारने त्यांची थकीत बिले तातडीने अदा करावीत, अशी भूमिका मांडली. “कंत्राटदारांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत त्यांच्या सोबत राहू,” असा विश्वास रोहित पवार यांनी आंदोलनकर्त्यांना दिला. त्यांच्या या भूमिकेमुळे थकीत बिलांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून शासन आता या आंदोलनाची कशी दखल घेते, याकडे कंत्राटदारांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, थकीत बिले तातडीने अदा करून कंत्राटदारांना आर्थिक संकटातून बाहेर काढावे, तसेच भविष्यात शासकीय कामांची बिले वेळेत मिळण्यासाठी ठोस यंत्रणा उभारावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.




