अग्रलेख

इतिहासातून भारताचा बौद्ध वारसा उजेडात आणणारा जेम्स प्रिन्सेप

सर जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म २० ऑगस्ट १७९९ रोजी झाला.

दिनेश बोधिराज, संपादक | आम्ही भारतीय साप्ताहिक

२० ऑगस्ट सर जेम्स प्रिन्सेप यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण करणे म्हणजे केवळ एका इंग्रज विद्वानाचे स्मरण नव्हे; तर भारताच्या प्राचीन इतिहासाच्या एका महत्त्वपूर्ण दुव्याची आठवण करून देणे होय. प्राचीन भारतीय शिलालेख, नाणी आणि लिपी यांचा अभ्यास करून इतिहासाच्या अनेक बंद दरवाजांची कुलपे उघडण्याचे काम प्रिन्सेप यांनी केले. सर जेम्स प्रिन्सेप यांचा जन्म २० ऑगस्ट १७९९ रोजी झाला. नाणकशास्त्र, शिलालेखशास्त्र, पुरातत्त्व आणि प्राच्यविद्या या क्षेत्रांत त्यांनी उल्लेखनीय काम केले. विशेषतः धम्म लिपीच्या वाचनाच्या उलगड्यातील त्यांचे योगदान भारतीय इतिहासाच्या अभ्यासासाठी मैलाचा दगड ठरले.आज आपण सम्राट अशोक, त्यांचे धम्मलेख आणि मौर्यकालीन भारत याविषयी ज्या आत्मविश्वासाने बोलतो, त्यामागे शिलालेखांच्या वाचनाचा मोठा वाटा आहे. ब्राह्मी लिपीतील लेख वाचता येऊ लागल्यानंतर भारतीय इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे समोर आला. प्रिन्सेप यांचे वैशिष्ट्य एवढ्यावरच थांबत नाही. भारतीय नाण्यांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. विविध ठिकाणांहून मिळणारी नाणी, शिलालेखांच्या प्रती आणि पुरातत्त्वीय माहिती यांचा परस्पर संबंध लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. १८३७ मध्ये ब्राह्मी शिलालेखांच्या अभ्यासातून ‘दानम्’ या शब्दाच्या वाचनासंबंधी त्यांनी महत्त्वपूर्ण निरीक्षण मांडले. अशा छोट्या-छोट्या भाषिक दुव्यांतून त्यांनी एका अपरिचित लिपीचे स्वरूप उलगडण्याचा मार्ग मोकळा केला. धम्म लिपीतील लेखांमध्ये वारंवार येणारे ‘देवानंप्रिय पियदस्सी’ हे संबोधन कोणत्या राजाशी संबंधित आहे, हा त्यांच्या समोरचा महत्त्वाचा प्रश्न होता. श्रीलंकेतील पाली ग्रंथांच्या अभ्यासातून आणि जॉर्ज टर्नर यांच्यासह इतर विद्वानांच्या सहकार्याने हे संबोधन सम्राट अशोकाशी जोडण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला. यामुळे शिलालेख आणि बौद्ध साहित्य यांच्यातील संबंध अधिक स्पष्ट झाला. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की, भारताचा प्राचीन इतिहास केवळ आख्यायिका, पुराणकथा किंवा नंतरच्या परंपरांच्या आधारे समजून घेता येत नाही. शिलालेख, नाणी, स्थापत्य, साहित्य आणि पुरातत्त्वीय पुरावे यांचा चिकित्सक अभ्यास आवश्यक असतो. जेम्स प्रिन्सेप यांच्या कार्याचे खरे महत्त्व याच ठिकाणी आहे. भारताच्या प्राचीन बौद्ध वारशाबाबत अनेक स्थळांची ओळख कालांतराने धूसर झाली होती. बौद्ध लेण्यांना ‘पांडव लेणी’ अशी ब्राह्मणी व्यवस्थेमुळे नावे मिळाली; काही प्राचीन स्तंभ आणि वास्तूंच्या संदर्भातही पौराणिक आख्यायिका प्रचलित झाल्या. त्यामुळे पुराव्यावर आधारित इतिहास आणि लोककल्पना यांच्यातील फरक करणे आवश्यक ठरते. अशोकाच्या स्तंभांबाबतही अनेक आख्यायिका निर्माण झाल्या. मात्र, शिलालेख वाचता आल्यानंतर त्या स्तंभांना त्यांचा ऐतिहासिक संदर्भ मिळू लागला. दगड आणि धातूवरील अक्षरे बोलू लागली आणि भारताच्या इतिहासाला पुराव्यांची नवी भाषा मिळाली. प्रिन्सेप यांनी ‘एशियाटिक सोसायटी’च्या नियतकालिकाच्या संपादक पदाच्या माध्यमातून देशाच्या विविध भागांतून मिळणारी नाणी आणि शिलालेख यांचा अभ्यास करण्यासाठी मोठे बौद्धिक जाळे उभे केले. पुढे भारतीय शिलालेखांचा व्यापक संग्रह तयार करण्याच्या कल्पनेला संस्थात्मक स्वरूप आले आणि १८७७ मध्ये सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या कार्यातून Corpus Inscriptionum Indicarum च्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले. म्हणूनच जेम्स प्रिन्सेप यांचे योगदान एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक संशोधनापुरते मर्यादित नाही. त्यांनी भारतीय इतिहासाच्या अभ्यासाची पद्धतच अधिक पुराव्याधिष्ठित करण्यास हातभार लावला. मात्र, त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना एक महत्त्वाची सावधगिरी आवश्यक आहे. प्रिन्सेप हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारतात कार्यरत असलेले ब्रिटिश अधिकारी आणि विद्वान होते. त्यामुळे त्यांच्या कार्याकडे ना अंधभक्तीने पाहण्याची गरज आहे, ना त्यांच्या ब्रिटिश असण्यामुळे त्यांचे संशोधन नाकारण्याची. इतिहासाचा अभ्यास व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वावर नव्हे, तर पुराव्यांच्या कसोटीवर झाला पाहिजे. याच कारणामुळे आज ‘बनावट इतिहास’ या शब्दाचा वापर करताना आपण अधिक जबाबदार असले पाहिजे. भारताचा इतिहास कोणत्याही एका समूहाने, एका विचारधारेने किंवा एका काळातील विद्वानांनी एकहाती लिहिलेला नाही. तो हजारो वर्षांच्या शिलालेखांत, नाण्यांत, लेण्यांत, ग्रंथांत, वास्तूंमध्ये आणि लोकपरंपरांमध्ये विखुरलेला आहे. त्या सर्व पुराव्यांचे चिकित्सक वाचन करणे हीच खरी इतिहासदृष्टी होय. जेम्स प्रिन्सेप यांच्या कार्यातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. इतिहास भावना आणि अभिमानातून नव्हे, तर पुराव्यांच्या शोधातून अधिक भक्कम होतो. आज त्यांच्या जयंतीनिमित्त ‘धम्म-लिपी गौरव दिवस’ साजरा करताना केवळ प्रिन्सेप यांचा गौरव करणे पुरेसे नाही. त्यांच्या संशोधन पद्धतीचा स्वीकार करणे अधिक महत्त्वाचे आहे. प्राचीन भारताच्या बौद्ध वारशाचा अभ्यास करताना शिलालेखांचे नव्याने वाचन झाले पाहिजे, पुरातत्त्वीय स्थळांचे संवर्धन झाले पाहिजे.

सम्राट अशोकाच्या शिलालेखांनी दोन हजार वर्षांपूर्वी जे सांगितले, ते जगाला पुन्हा वाचता आले. कारण कुणीतरी त्या दगडांवरील अक्षरांचे रहस्य उलगडण्याचा ध्यास घेतला. सर जेम्स प्रिन्सेप यांचे खरे स्मरण म्हणजे त्यांच्या नावाचा जयघोष नव्हे; तर भारताचा इतिहास पुराव्यांच्या प्रकाशात पुन्हा पुन्हा तपासण्याची बौद्धिक हिंमत. ‘आम्ही भारतीय साप्ताहिक’ची भूमिका स्पष्ट आहे. इतिहास कोणाच्याही मालकीचा नाही. तो जनतेचा सामूहिक वारसा आहे. त्यामुळे इतिहासातील विकृती कोणत्याही दिशेची असो, तिचा प्रतिकार पुराव्यांच्या आधारेच झाला पाहिजे. जेम्स प्रिन्सेप यांनी दगडांवरची अक्षरे वाचली; आता आपली जबाबदारी आहे; त्या अक्षरांमधून समोर आलेला इतिहास जण माणसापर्यंत पोहोचविण्याची.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!