चळवळ

आषाढी वारीनिमित्त श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानची २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य भेट

अति दुर्गम वडपाडा, पिंपळपाडा, बोंडारपाडा आणि वांगणपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप

‘शैक्षणिक वारी’ उत्साहात

आम्ही भारतीय, साप्ताहिक / आकाश तपासे : ठाणे, आषाढी वारीचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करून ‘शैक्षणिक वारी’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. गेल्या सहा वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सातत्याने राबविला जात आहे. ज्या ठिकाणी साधी बसदेखील व्यवस्थित पोहोचत नाही, अशा वडपाडा, पिंपळपाडा, बोंडारपाडा आणि वांगणपाडा येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.

यावर्षी एकूण २०० विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तर, वह्या, पेन्सिल, पेन, पट्टी, चित्रकला वही, रंगसाहित्य, पाण्याच्या बाटल्या तसेच त्या परिसरात सहज उपलब्ध न होणारे विविध शैक्षणिक साहित्य देण्यात आले. याशिवाय शाळांच्या शैक्षणिक कामकाजासाठी आवश्यक स्टेशनरीचाही पुरवठा करण्यात आला. साहित्य स्वीकारताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद, डोळ्यांतील चमक आणि निरागस हास्य पाहून उपस्थित सर्वांचे मन भारावून गेले. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचा हा छोटासा प्रयत्न असून, भविष्यात हीच मुले शिक्षणाच्या बळावर मोठी भरारी घेतील, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. आषाढी वारी अनेक जण विविध प्रकारे साजरी करतात; मात्र श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान दरवर्षी ‘शैक्षणिक वारी’च्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश देत सामाजिक बांधिलकी जपत आहे.

हितचिंतक आणि देणगीदारांनी दिलेल्या मदतीमुळे ही शैक्षणिक भेट गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असून, हीच त्यांच्या सहकार्याची खरी पोचपावती असल्याची भावना संस्थेने व्यक्त केली. संत तुकाराम महाराजांच्या “साधू-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा” या अभंगाची प्रचिती या उपक्रमादरम्यान आली. साहित्य वाटपाबरोबरच विद्यार्थ्यांशी संवाद, गप्पा, आदिवासी नृत्य, लेझीम सादरीकरण अशा विविध उपक्रमांनी संपूर्ण परिसर आनंदमय झाला आणि शैक्षणिक वारी अविस्मरणीय ठरली.हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रुपेश शिंदे, सचिव अजय भोसले, उपाध्यक्षा पूनम सावंत तसेच सदस्य शुभम कांबळे, निशांत कोळी, आरती गाढवे, पल्लवी लंके, अमोल पाटील, राजेंद्र गोसावी, भाग्यश्री गिरी, पद्मा मैथिस आणि महेंद्र कांबळे यांनी मोलाचे योगदान दिले.

संपर्क : अजय आनंदी महादेव भोसले सचिव, श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठान, ठाणे मो. : ८१०८९४९१०२

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!