Ph.D. फेलोशिपच्या अन्यायकारक अटी रद्द करा; अन्यथा राज्यभर आंदोलन : भीम आर्मीचा इशारा
BARTI, SARTHI, महाज्योतीतील संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुण्यात प्रशासनाशी चर्चा

पुणे, दि. ८ ऑगस्ट २०२६ | आम्ही भारतीय साप्ताहिक प्रतिनिधी
BARTI, SARTHI, महाज्योती तसेच इतर महामंडळांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या Ph.D. Fellowship संदर्भात लागू करण्यात आलेल्या नव्या अटी रद्द करून संशोधक विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे सर्व लाभ देण्यात यावेत, अशी मागणी भीम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागण्यांसाठी पुणे येथे BARTI प्रशासनाची भेट घेऊन संशोधक विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. Ph.D. संशोधक विद्यार्थ्यांचे नेतृत्व श्री. दीपक घोडेस्वार यांनी केले. यावेळी फेलोशिपसाठी विद्यार्थ्यांची संख्या १०० पर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय, ३५ वर्षांची वयोमर्यादा, HRA तसेच Contingency Grant बंद करण्यासह विविध निर्णयांमुळे संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा मुद्दा प्रशासनासमोर मांडण्यात आला. शिष्टमंडळाने Ph.D. Fellowship साठी विद्यार्थ्यांची संख्या १०० पर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, ३५ वर्षांची वयोमर्यादा पूर्ववत रद्द करावी, HRA व Contingency Grant पूर्वीप्रमाणे सुरू करावे तसेच BARTI, SARTHI, महाज्योती व इतर महामंडळांमार्फत संशोधक विद्यार्थ्यांना मिळणारे सर्व लाभ पूर्ववत सुरू करावेत, अशा मागण्या केल्या. बैठकीदरम्यान ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि ॲड. जयश्री पाटील यांनी BARTIच्या महासंचालकांसमोर संशोधक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणालाही खेळ करू दिला जाणार नाही, असे स्पष्ट करत अन्यायकारक निर्णय मागे घेण्याची मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयीन मार्गाचा अवलंब करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे यांनीही प्रशासनाला स्पष्ट इशारा देताना संशोधक विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी केली. अन्यथा भीम आर्मीच्या वतीने राज्यभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल. तसेच या प्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याची भूमिकाही त्यांनी जाहीर केली. यावेळी ॲड. गुणरत्न सदावर्ते, ॲड. जयश्री पाटील, भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक कांबळे, ॲड. तोसिफ शेख, दादासाहेब शिंदे, संदीप शेलार, स्वाती गायकवाड, मुकेश गायकवाड, सावंत साहेब, सनी सोनकांबळे, भीम राज सेनेचे प्रमुख राजू थाठे यांच्यासह मोठ्या संख्येने संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.संशोधक विद्यार्थ्यांच्या संविधानिक व शैक्षणिक हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भीम आर्मीने केली असून, मागण्या मान्य होईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.




