९० वर्षांनंतर उज्जैनच्या वैश्य टेकरीकडे पुन्हा लक्ष ३५० फूट व्यासाच्या विशाल वास्तूचे नव्याने उत्खनन; मौर्यकालीन उज्जैनच्या इतिहास जगासमोर येणार
९० वर्षांनंतर उज्जैनच्या वैश्य टेकरीकडे पुन्हा लक्ष ३५० फूट व्यासाच्या विशाल वास्तूचे नव्याने उत्खनन; मौर्यकालीन उज्जैनच्या इतिहासावर पडणार नवा प्रकाश

आम्ही भारतीय, साप्ताहिक
उज्जैन, १७ ऑगस्ट २०२६ | दिनेश बोधिराज : मध्य प्रदेशातील उज्जैन शहराच्या प्राचीन वैभवावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उज्जैन येथील वैश्य टेकरी या पुरातत्त्वीय स्थळावर तब्बल ९० वर्षांनंतर पुन्हा उत्खनन आणि संवर्धनाची प्रक्रिया सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे. या टेकडीखालील वास्तू ही अशोककालीन विशाल स्तूपाची असू शकते आणि तिचा आकार प्रसिद्ध सांची स्तूपापेक्षाही मोठा असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (ASI) या ठिकाणी सविस्तर उत्खनन करण्याचा प्रस्ताव मांडला असून, संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी किमान तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. उज्जैनचे महत्त्व लक्षात घेता मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही या प्रकल्पाला विशेष पाठिंबा दिल्याचे सांगितले जात आहे. १९३८-३९ मध्येच झाली होती विशाल स्तूपाची नोंदवैश्य टेकरीचे महत्त्व आज प्रथमच समोर आलेले नाही. ग्वाल्हेर संस्थानाच्या पुरातत्व विभागाने १९३८-३९ मध्ये येथे उत्खनन केले होते. त्या काळातील अहवालात या वास्तूचा उल्लेख “एक विशाल स्तूप” असा करण्यात आला होता. उत्खननातून मिळालेल्या पुराव्यांनुसार या स्तूपाची मूळ उंची १०० फुटांपेक्षा कमी नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. स्तूपाच्या पायाचा संभाव्य व्यास सुमारे ३५० फूट असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे या वास्तूचे संपूर्ण उत्खनन झाल्यास प्राचीन भारतातील बौद्ध स्थापत्याचा एक अत्यंत महत्त्वाचा नमुना जगासमोर येऊ शकतो. मौर्यकालीन बांधकामाचे पुरावेवैश्य टेकरीवरील वास्तूच्या बांधकामात ठोकून तयार केलेल्या काळसर मुरुमाचा मजबूत गाभा आढळला होता. त्यावर अत्यंत मोठ्या आकाराच्या विटांचे बांधकाम करण्यात आलेले असल्याचे जुन्या उत्खननातून स्पष्ट झाले. या परिसरातून ठसा उमटवलेली नाणी तसेच ओतीव अवंती नाणी मिळाल्याने या वास्तूचा संबंध प्राचीन अवंती आणि मौर्यकालाशी जोडला जातो. बांधकामाच्या रचनेतही तत्कालीन अभियांत्रिकी कौशल्याची झलक दिसून येते. स्तूपाभोवती नियमित चौकोनी खंदक तयार करण्यात आला होता. तसेच शहरातून स्तूपापर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग असल्याचे पुरावेही मिळाले होते. स्तूपाच्या पायाभागात वरच्या संरचनेचा भार पेलण्यासाठी आणि तिरक्या दाबाचा सामना करण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे दगडी बांधकाम करण्यात आले होते. उज्जैन आणि सम्राट अशोकाचा संबंध मौर्य साम्राज्याच्या इतिहासात उज्जैनला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्राचीन अवंतीची राजधानी असलेल्या उज्जैनचा सम्राट अशोकाशीही जवळचा ऐतिहासिक संबंध सांगितला जातो. अशोकाच्या राज्याभिषेकापूर्वी तो उज्जैनचा प्रशासक किंवा राज्यपाल म्हणून येथे कार्यरत होता. त्यामुळे वैश्य टेकरीवरील वास्तूचे नव्याने वैज्ञानिक पद्धतीने उत्खनन झाल्यास अशोककालीन उज्जैन, मौर्य प्रशासन आणि भारतातील बौद्ध धर्माचा प्रारंभिक प्रसार याविषयी महत्त्वपूर्ण पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
सांचीपेक्षा मोठा स्तूप असल्याचा दावा?
मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील सांची हे जगप्रसिद्ध बौद्ध वारसा स्थळ आहे. सम्राट अशोकाच्या काळात इ. स. पूर्व तिसऱ्या शतकात येथे बौद्ध स्थापत्याचा विकास झाला. सांचीचा महान स्तूप म्हणजे स्तूप क्रमांक १ हा भारतीय बौद्ध स्थापत्याचा जागतिक स्तरावरील प्रसिद्ध नमुना आहे. सांची स्तूपाची सध्याची उंची सुमारे ५४ फूट आहे. त्याच्या मध्यभागी अर्धगोलाकार अंड, त्यावर हार्मिका आणि छत्र, तसेच प्रदक्षिणेसाठी गोलाकार मार्ग आहे. नंतरच्या काळात सातवाहनांच्या आश्रयाखाली त्याला चार भव्य तोरणे जोडण्यात आली. या तोरणांवर जातककथा, बुद्धांच्या जीवनातील प्रसंग आणि बौद्ध प्रतीकांची अप्रतिम शिल्पकला पाहायला मिळते. सुरुवातीच्या सांची कलेत बुद्धांना मानवी रूपात न दाखवता बोधीवृक्ष, धर्मचक्र, रिकामे सिंहासन आणि पदचिन्हे यांसारख्या प्रतीकांमधून त्यांचे दर्शन घडवले जाते.
सांचीप्रमाणेच वैश्य टेकरीचे उत्खनन पूर्ण झाल्यास मध्य भारतातील बौद्ध स्थापत्याच्या इतिहासात एक नवा अध्याय उघडू शकतो. विशेषतः ३५० फूट व्यासाची रचना असल्याचे पुरावे अधिकृत उत्खननातून निश्चित झाले, तर तिचे स्थापत्य महत्त्व अत्यंत मोठे ठरेल. मात्र “सांची पेक्षाही मोठा स्तूप” हा दावा असला तरी नव्या उत्खननातून मिळणारे पुरातत्त्वीय पुरावे, वास्तूची अचूक रचना आणि कालमान निश्चित होणे आवश्यक आहे.
खाजगी जमिनीच्या संपादनाचे आव्हानवैश्य टेकरीचा संपूर्ण परिसर पुरातत्त्वीय संशोधनासाठी उपलब्ध करून देण्यासाठी आजूबाजूच्या काही खाजगी जमिनींचे संपादन आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. उज्जैन जिल्हा प्रशासनाकडून भूसंपादनाचा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहिती आहे. ९० वर्षांनंतर पुन्हा उघडणार इतिहासाची दारे ! १९३८-३९ मध्ये झालेल्या प्राथमिक उत्खननानंतर वैश्य टेकरीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाले. आता आधुनिक पुरातत्त्वीय तंत्रज्ञानाच्या मदतीने पुन्हा उत्खनन सुरू झाल्यास या टेकडीच्या गर्भात दडलेला इतिहास अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उज्जैनचे प्राचीन धार्मिक, व्यापारी आणि राजकीय महत्त्व लक्षात घेता वैश्य टेकरीवरील उत्खनन केवळ एका स्तूपाचा शोध नसून मौर्यकालीन भारताचा इतिहासाचा जगासमोर येईल.



