बदलापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात संपन्न

प्रबोधन कट्टाच्या वतीने बदलापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. बदलापूर प्रबोधन कट्टाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान स्मारक, बदलापूर येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. सामाजिक समता, शिक्षणाचा प्रसार, मागासवर्गीयांसाठी आरक्षण, महिलांचे सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि लोकहितकारी शासनव्यवस्था यांचा पाया रचणारे लोकहितदक्ष जाणते राजे म्हणून ओळखले जाणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना यावेळी अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून वंदनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यानंतर मा. राजाराम खरात यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रबोधन कट्टाचे उपाध्यक्ष मा. सुभाष रणपिसे यांनी उपस्थितांचे स्वागत करत संस्थेच्या आजपर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेतला.मा. अमोल जगधने यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा सविस्तर जीवनपट उलगडून सांगितला. साहित्यिक प्रा. अनिल भालेराव यांनी शाहू महाराज हे रयतेची काळजी घेणारे, सामाजिक न्यायाची अंमलबजावणी करणारे लोकहितदक्ष राजे होते, असे प्रतिपादन केले. आंबेडकरी विचारवंत व लेखक मा. विनायक आढांगळे यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक परिवर्तनातील योगदानाचा विस्तृत आढावा घेतला.यावेळी बौद्धाचार्य मा. अशोक गजरमल, मा. पांडुरंग वाव्हळ तसेच मा. मिलिंद सकपाळ यांनीही मनोगत व्यक्त करून शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मा. संजय काळेवाघ आणि मा. पुष्पाताई शिंदे यांनी गीत सादर केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मा. स्वप्निल शिर्के (भाऊ) यांनी केले. सामुदायिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांना पेढे वाटून जयंतीचा आनंद साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास R.P.I. (R.K.) पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
– सुभाष रणपिसेउपाध्यक्ष, प्रबोधन कट्टा, बदलापूर शहर

