आता उठवू सारे रान; युवकांचा आवाज बुलंद
युवकांना योग्य दिशा आणि व्यासपीठ मिळाल्यास ते समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात

आम्ही भारतीय / साप्ताहिक / डिजिटल / आकाश तपासे : आता उठवू सारे रान; युवकांचा आवाज बुलंद शिक्षण, बेरोजगारी, पेपरफुटी, NEET, AI, व्यसनाधीनता, खेळाडूंवरील अत्याचारांसह विविध प्रश्नांवर युवकांची परखड मते मुंबई : शिक्षणाचा प्रश्न आता केवळ शिक्षणापुरता मर्यादित राहिलेला नसून, त्यातून बेरोजगारी, पेपरफुटी, वाढती शैक्षणिक फी, NEET परीक्षा, व्यसनाधीनता, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, खेळाडूंवरील अत्याचार, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), E20 पेट्रोल व इथेनॉल यांसह समाजातील विविध प्रश्नांचा आवाज बुलंद होत आहे. याच पार्श्वभूमीवर जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या माध्यमातून लक्ष परिवर्तन संस्थेच्या वतीने आयोजित ‘युवकांचा आवाज’ या कार्यक्रमात युवकांनी विविध सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांवर परखडपणे आपली मते मांडली. कार्यक्रमात युवकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील तसेच समाजासमोरील अनेक प्रश्न उपस्थित केले. शिक्षण व्यवस्था अधिक सक्षम व सर्वसमावेशक करण्याची गरज, वाढती बेरोजगारी, महागडे शिक्षण, परीक्षांमधील गैरप्रकार, पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्नांवर सरकारने गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता असल्याचे युवकांनी सांगितले. “प्रश्न आपला आहे की केवळ दुसऱ्याचा?” असा सवाल उपस्थित करत एखाद्या व्यक्तीसमोरील समस्या म्हणून प्रश्नांकडे पाहण्याऐवजी समाजातील प्रत्येक प्रश्न हा सामूहिक प्रश्न आहे. त्यामुळे अन्याय आणि गैरप्रकारांविरोधात आवाज उठवणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. AI च्या अतिवापराबाबत चिंता कृत्रिम बुद्धिमत्तेचा अर्थात AI चा वाढता वापर हा चर्चेतील महत्त्वाचा विषय ठरला. AI हे आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रभावी साधन असले तरी त्याचा अतिवापर आणि त्यावरील अतिनिर्भरता विद्यार्थ्यांच्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम करू शकते. मोबाईल, AI आणि विविध ॲप्सच्या अतिवापरामुळे युवकांमध्ये तणाव आणि डिजिटल अवलंबित्व वाढत असल्याची चिंता युवकांनी व्यक्त केली. AI चा योग्य आणि विधायक वापर करण्याबरोबरच त्याचा गैरवापर आणि अतिनिर्भरता टाळण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि जबाबदार वापराबाबत जनजागृती करण्याची गरज असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. व्यसनाधीनतेच्या वाढत्या विळख्यावर प्रश्नचिन्ह लहान मुलांपासून युवकांपर्यंत वाढत चाललेली अमली पदार्थांची समस्या हा देखील चर्चेचा गंभीर विषय ठरला. गल्लीबोळात व्यसनाचे जाळे वाढत असताना प्रशासन आणि पोलिस यंत्रणा अधिक प्रभावीपणे कारवाई कधी करणार, असा सवाल युवकांनी उपस्थित केला. विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, मानसिक तणाव, महिला व खेळाडूंवरील अत्याचार यांसारख्या प्रश्नांवरही युवकांनी आपले अनुभव आणि विचार मांडले. केवळ समस्या मांडून थांबण्याऐवजी त्यावर ठोस उपाय शोधण्याची आणि प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त झाले. ‘हम सब एक हैं’च्या घोषणेने युवकांमध्ये उत्साह कार्यक्रमादरम्यान ‘हम सब एक हैं’ या घोषणेने वातावरणात उत्साह निर्माण झाला. युवकांचे प्रश्न युवकांनीच पुढे आणण्यासाठी आणि त्यावर सामूहिकपणे काम करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले. समाजात बदल घडवून आणण्यासाठी केवळ सरकारकडे अपेक्षा ठेवून चालणार नाही. नागरिकांनी प्रश्न विचारणे, आपले विचार मांडणे, उपाय सुचवणे आणि त्या उपायांसाठी प्रत्यक्ष कृती करणे आवश्यक आहे. युवकांना योग्य दिशा मिळाल्यास ते समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणू शकतात, असा विश्वास कार्यक्रमातून व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे डॉ. संजय मंगला गोपाळ, श्रमिक जनता संघाचे सरचिटणीस जगदीश खैरालिया, वी नीड यू सोसायटीचे सचिव अभय कांता, समता विचार प्रसारक संस्थेच्या सचिव लतिका सुप्रभा मोतीराम, जनआंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाचे अजय भोसले, तसेच लक्ष परिवर्तन संस्थेचे अध्यक्ष गोरख हिवाळे, योगेश कांबळे व इतर सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वी नीड यू सोसायटीच्या सदस्या कल्पना ताई, मनिषा ताई, रोनित तसेच इतर सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘युवकांचा आवाज’ हा उपक्रम भविष्यात अधिक संधी दिल्यास राज्यातील जास्तीत जास्त युवकांपर्यंत पोहोचविण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. “आता उठवू सारे रान, युवकांचा आवाज बुलंद करूया,” या संदेशातून सामाजिक प्रश्नांवर युवकांना संघटित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.




