राजकीय

माणगावजवळ काळ नदीवरील नव्या पुलाचा भराव खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

आम्ही भारतीय,साप्ताहिक/ डिजिटल :माणगाव (रायगड) : मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ काळ नदीवरील नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाच्या भरावाचा भाग पहिल्याच पावसात खचल्याने महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाने पुलावरील वाहतूक तातडीने बंद केली असून पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

या घटनेनंतर संताप व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र चव्हाण यांनी माणगावचे प्रांत अधिकारी आणि पोलिस प्रशासनाकडे निवेदन सादर केले. निकृष्ट दर्जाचे आणि घाईघाईत करण्यात आलेल्या कामासाठी जबाबदार असलेल्या संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेल्या सुमारे १७ वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. या विलंबामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरवर्षी पावसाळ्यात रस्ते खचणे, खड्डे पडणे आणि नव्याने झालेल्या कामांचे नुकसान होणे, या घटनांमुळे महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत.

रवींद्र चव्हाण यांनी या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, “असा महामार्ग म्हणजे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे. या महामार्गाला ‘पणवती महामार्ग’ घोषित करण्याची वेळ आली आहे,” अशी टीका केली. तसेच, दोषी अधिकारी, अभियंते आणि ठेकेदार यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशीही त्यांनी मागणी केली.

दरम्यान, या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, संबंधित यंत्रणांनी सखोल चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडूनही केली जात आहे.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!