नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी ७ जुलै रोजी मंत्रालयावर निघणार भव्य पायी मोर्चा !
दि बा पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी रश्मिता पोपेटा यांचे आमरण उपोषण सुरूच!

आम्ही भारतीय / साप्ताहिक : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील (दिबा) यांचेच नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेल-उरणमधील भूमिपुत्रांनी पुन्हा एकदा एल्गार पुकारला आहे. दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ नामांतरासाठी रश्मिता पोपेटा यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. “रक्ताचे पाणी झाले तरी मागे हटणार नाही, विमानतळाला दिबांचेच नाव द्या” अशी ठाम भूमिका स्थानिक भूमिपुत्रानी घेतली आहे.
दि बा समर्थक रश्मिता पोपेटा यांनी विमानतळाच्या प्रवेशद्वाराजवळ उपोषण सुरू केले आहे. प्रकृती खालावली तरीही, “विमानतळावर दि. बा. पाटील यांचे नाव झळकल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही,” असा निर्धार त्यांनी केला आहे. आमरण उपोषण स्थळ जासई येथे बैठक संपन्न झाली. नामकरणाची पुढील दिशा ठरविण्यासाठी जासई येथील दि. बा. पाटील सभागारात भूमिपुत्र आणि सर्वपक्षीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी रक्ताने पत्र लिहून, नवी मुंबई विमानतळावर दि बा पाटील यांचाच हक्क असल्याचे अधोरेखित केले आहे. त्यांच्या मते “आमच्या रक्तावर दि. बा. पाटील यांचाच अधिकार आहे. आज प्रकल्पग्रस्त म्हणून आम्ही जे स्थान निर्माण केले आहे, कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीचे जे मालक झालो आहोत आणि जे सुखाने जगत आहोत, त्यामागे दि. बा. पाटील यांचेच मोठे योगदान आहे. त्या ऋणाची जाणीव म्हणून आणि आमच्या रक्तातील प्रत्येक थेंबावर त्यांचा अधिकार असल्याच्या भावनेतून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्रव्यवहार करावा असं वाटलं.”
मंत्रालयावर निघणार पायी मोर्चा
ठोस निर्णयासाठी ५ जिल्ह्यांतील भूमिपुत्रांचा ७ जुलै रोजी मंत्रालयावर भव्य पायी मोर्चा काढणार आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नामकरणासाठी सिडको आणि सरकारला इशारा देत मोर्चाची जोरदार तयारी. लवकरात लवकर दि. बा. पाटील यांच्या नामांकनाचा अंतिम निर्णय झाला नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे.

लोकनेते दि. बा. पाटील (दिनकर बाळू पाटील) यांचा जन्म १३ जानेवारी १९२६ रोजी रायगड जिल्ह्यातील जासई येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी पुण्यातून वकिलीचे शिक्षण घेतले. पनवेल नगरपालिकेचे ते पहिले नगराध्यक्ष होते. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईची उभारणी होत असताना, भूमिपुत्रांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेतल्या जात होत्या. दि. बा. पाटील यांनी शेतकऱ्यांना एकत्र केले आणि ऐतिहासिक लढा उभारला. त्यांच्या आंदोलनामुळेच प्रकल्पग्रस्तांसाठी १२.५ टक्के विकसित भूखंड देण्याची योजना सरकारने मान्य केली. याशिवाय भूमिपुत्रांना योग्य मोबदला मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वारसामहाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केले.
1957 च्या सुमारास ज्यावेळी बेळगावच्या सीमेवर जाऊन महाराष्ट्रासाठी आंदोलन करण्याचं ठरलं, त्यावेळी पनवेल, अलिबाग भागातून दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील यांच्यावर आंदोलक आणण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. सीमेवर हे नेते पोहोचल्यावर त्यांना दोनवेळा अटक झाली. मग सोडून देण्यात आलं, तेव्हा दि. बा. पाटील आणि दत्ता पाटील परतत असताना निपाणीजवळ सत्याग्रह सुरू असल्याचं दिसलं, तर त्यांनी त्यात सहभाग घेतला.यावेळी मात्र दिबा आणि दत्ता पाटलांना पोलिसांनी सोडलं नाही. त्यांना एका वर्षांचा तुरुंगवास ठोठावला. पण त्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी ही शिक्षाही भोगली. पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरही 1962, 1967, 1972 आणि 1980 अशावेळी आमदार म्हणून विधानसभेत निवडून गेले. पुढेही सीमाभागातील मराठीजनांवरील अन्यायाविरोधात प्रा. एन. डी. पाटलांच्या खांद्याला खांदा लावून दि. बा. पाटलांनी विधानसभेत आवाज उठवला. लोकल बोर्डापासून सुरू झालेली दिबांची राजकीय कारकीर्द पाचवेळा आमदार आणि दोनवेळा खासदार अशी राहिली. दोनवेळा ते लोकसभा पराभूतही झाले. त्यातला जिव्हारी लागलेला पराभव म्हणजे 1999 सालचा.16 ऑगस्ट 1999 रोजी दि. बा. पाटलांनी शिवसेनेत प्रवेश केला. चार दशकांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षासोबत राहिलेल्या आणि निधर्मी राजकारणाचे पुरस्कर्ते राहिलेल्या दि.बा. पाटलांच्या या प्रवेशाचा अनेकांना धक्का बसला होता. शिवसेनेतून लढवलेली लोकसभा पराभूत झाल्यानंतर ते राजकारणातून बाहेर पडून सामाजिक आंदोलनांशी त्यांनी संबंध जोडला. ते मार्गदर्शकाच्या भूमिकेत कायम राहिले. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कांसाठी शेवटपर्यंत दि. बा. पाटील सक्रिय राहिले. 24 जून 2013 मध्ये दि. बा. पाटलांचं निधन झालं आणि प्रकल्पग्रस्तांचा आवाज हरपला.

