अतिवृष्टीमुळे पनवेल मध्ये 334 नागरिकांचे प्रशासनाने स्थलांतर केले असून पनवेल महानगरपालिकेकडून सेवा सुविधा पुरविल्या जात आहेत
उपायुक्त मुख्यालय कैलास गावडे यांच्या आदेशानुसार या नागरिकांसाठी सकाळी चहा-नाश्त्याची व्यवस्था

आम्ही भारतीय साप्ताहिक डिजिटल,पनवेल: अतिवृष्टीमुळे पनवेल मध्ये 334 नागरिकांचे स्थलांतर झाले असून, पनवेल महापालिकेकडून भोजन आणि वैद्यकीय सेवा सुरू आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे पनवेल महानगरपालिका हद्दीतील सखल भागात पाणी शिरल्याने दोन ठिकाणच्या नागरिकांना रविवार पाच जुलै 5 रोजी सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.पनवेल शहरातील पनवेल, पटेल मोहल्ला व कच्ची मोहल्ला येथील भारत नगर झोपडपट्टी मधील पाणी वाढल्याने उर्दू शाळेत 149 नागरिक तर कोळीवाडा शाळेत 110 नागरिक असे एकूण 259 नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. महापालिकेच्या भांडार विभागामार्फत या नागरिकांसाठी चहा, बिस्कीट, पिण्याचे पाणी आणि नाश्त्याची तातडीची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दुपारच्या जेवणाची व्यवस्थाही करण्याचे आदेश भांडार विभागाला देण्यात आले आहेत.दुसरीकडे प्रभाग समिती क, कामोठे HOC कॉलनी आदिवासी वाडी येथील रहिवाशांना शनिवारी सायंकाळी पावसाचे प्रमाण वाढल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कामोठे क्रीडा संकुल येथे हलवण्यात आले.येथे 75 नागरिकांसाठी अंथरून, पांघरून, पंखे, मच्छर अगरबत्ती, जेवण, पाणी आणि वैद्यकीय सेवा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व नागरिकांची नोंद करण्यासाठी रजिस्टर ठेवण्यात आले आहे. उपायुक्त मुख्यालय कैलास गावडे यांच्या आदेशानुसार या नागरिकांसाठी सकाळी चहा-नाश्त्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी भंडार विभागाचे प्रकाश गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. पालिकेचे अधिकारी सदर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

