आजचा रंग पिवळा – रेड लाइट एरियात भेटलेल्या हजारो मुलींपैकीच एक संगीता डे, होती


आजचा रंग पिवळा – रेड लाइट एरियात भेटलेल्या हजारो मुलींपैकीच एक संगीता डे, होती. ती भेटली तो इलाखा होता कालीघाट, ऑफ रोड, कोलकता, बंगाल! आपल्याकडे महाराष्ट्रात जगदंबा, भवानीमाता देवीभक्तीसाठी जशा पुज्यनीय मानल्या जातात तद्वतच देशभरात दुर्गा आणि काली ही देवतेची रूपं प्रसिद्ध आहेत. बारोमास ज्या प्रदेशात कालीपूजा चालते, जी तिथली आराध्य दैवता आहे त्या कालीच्या नावाने असणाऱ्या कालीघाटनजीक रेड लाईट एरिया आहे हे कोलकत्याचं दुर्दैव. मदर स्टेट बंगाल, झारखंड, ओरिसा, बिहार, आसाम आणि बांगलादेशमधून इथे मोठ्या प्रमाणावर बायकापोरी आणल्या जातात. संगीताच्या आईचं नाव जस्मीन डे, ती बंगालमधली. बीरभूम मधल्या एका छोट्याशा गावातला तिचा जन्म. जस्मीनची आई ग्रामीण भागातील गणिका. आईला दारूचं व्यसन आणि पैशाचा हव्यास असल्यानं जस्मीन वयात येताच तिने पैसे घेऊन एका प्रौढाशी तिचं लग्न लावून दिलं. जस्मीनला, नवरा आणि सासू मारहाण करायचे. एके दिवशी तिच्या दिराने तिचं शोषण केलं. या भयंकर कृत्याला तिच्या नवऱ्याची फूस होती. जस्मीनला त्या नरक यातना सोसण्याशिवाय पर्याय नव्हता, तिने माघारी वळून जावं असं हक्काचं घरही तिला नव्हतं. अगदी कोवळ्या वयात तिला दोन मुली झाल्या, संगीता आणि जुमा ही त्यांची नावं. जस्मीनचा मनसोक्त उपभोग घेऊन झाल्यावर हवा तितका छळ करून मनाची तृप्तता झाल्यावर तिच्या नवऱ्याने तिला विकायचं ठरवलं! तेही मुलींसह! आशियातला सर्वात मोठा रेड लाईट एरिया असणाऱ्या कोलकत्यातल्या सोनागाचीत तिला विकलं तर कधीतरी आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्यांनं तिला घेऊन दिल्ली गाठली. पण दोन चिमुरड्या मुलींसह जस्मीनला विकत घ्यायला कुणी तयार नव्हतं. अखेर तो तिला परत घेऊन आला. त्याला भीती वाटली की पोलिसांना आपला संशय आलाय! त्या भीतीपोटी त्यांना बेवारशासारखं रेल्वे स्टेशनवर सोडून गेला. आपल्या चिमुरड्या मुलींना घेऊन जस्मीनने रेल्वे स्टेशन परिसरात दोन रात्री काढल्या. प्लॅटफॉर्मवर सावजाच्या शोधात घिरट्या घालणाऱ्या वेश्यांनी तिची अवस्था बरोबर ओळखली, तिला घेऊन त्या बाओबाजारमध्ये गेल्या. तिला लाईनमध्ये येण्याच्या चार गोष्टी शिकवल्या, समजावून सांगितल्या. समोर कुठलाच पर्याय नसल्यानं जस्मीनने संमती दिली.पहिल्या रात्री मिळालेल्या साठ रुपयातून तिने पोरींची भूक भागवली. नंतर धंदा तिच्या अंगवळणी पडला. त्याच परिसरात तिने भाड्याने एक खोली घेतली आणि सलग दशकभर धंदा केला. तिच्याकडे गिऱ्हाईक आलं की ती थोरल्या संगीताला आपली धाकटी बहीण जुमा, हिच्याकडे लक्ष देण्यासाठी बजावत असे. ‘फुल नाईट किंवा फुल डे’ चं गिऱ्हाईक आलं की, तिच्या जीवाची अवस्था हरिणीसारखी होई, एकीकडे मुली रस्त्यावर आणि एकीकडे श्वापद तिच्या देहावर स्वार असे. विष खाऊन मरण्यापेक्षा जस्मीनने मुली जगवायचं ठरवलं आणि या दलदलीत ती स्वतःला रुतवत गेली. हा संघर्ष रक्तहीन असला तरी प्रचंड थकवणारा आणि झुंजवणारा होता, ज्याला जस्मीनने तोंड दिलं.रेड लाईट एरियावर अभ्यास करण्यासाठी फोटो जर्नलिस्ट डिना ब्रेनेट कोलकत्यात आली होती; तिने रस्त्यावर झोपलेल्या संगीताला पाहिलं. ब्रेनेटचे सहकारी असलेले शाहनवाज सिद यांनी संगीताचा फोटो घेतला. तोच फोटो लेखासोबत दिलाय. डिना ब्रेनेटनं जस्मीनचा पाठपुरावा केला, तिच्या मदतीसाठी हातपाय मारले. संगीताचा सांभाळ करण्यास असमर्थ ठरल्याने एका टिनएजर मुलासोबत तिचे लग्न लावून देण्यात आलं. मात्र तिच्या सासूने तिला हा नरक दाखवला! अल्पवयीन असताना लग्न करुनही ती ह्या दलदलीत ओढली गेली! याच परिसरात उर्मिला बासू यांची ‘न्यू लाईट’ ही एनजीओ काम करते, उर्मी बासू या नावाने त्या अधिक परिचित आहेत. वेश्यांच्या मुलांचं पालन पोषण करणं हे यांचं ध्येय. त्यासाठी त्या अहोरात्र झटत असतात. सोमा हाऊसमध्ये त्यांचा व्याप चालतो, तिथं या मुली राहतात, त्यांच्या शिक्षणापासून ते जीवनावश्यक बाबींचा पुरवठा करण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा खर्च न्यू लाईट कडून होतो. जस्मीनची माहिती मिळताच, संगीता आणि जुमाला त्यांनी सोमा हाऊसमध्ये दाखल करून घेतलं. मग कुठे जस्मीनला हायसं वाटलं. आता जस्मीन धंदा करत नाही पण तिने कुठंही नाव पत्ता बदलून राहिलं तरी लोक तिचा पूर्वेतिहास शोधून काढतात आणि तिच्या लुगड्यातला अंधार हुंगत राहतात.या मुलींचे पुनर्वसन होईल, यातल्या बायकांचे शोषण ही कमी होईल परंतु यांचा पूर्वेतिहास कळल्यावर यांना फुकटात वा पैसे टाकून उपभोगायच्या प्रवृत्तीत कधीच बदल होणार नाही. त्या साठी समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा आणि त्यात प्रगल्भता यायला हवी. उर्मिला बासू यांच्या एका उपक्रमाचं नाव आहे ‘हाफ द स्काय’! या बायकांच्या आणि त्यांच्या मुलीबाळींच्या वाट्याला येणारं किमान अर्ध आकाश तरी आपण त्यांना बहाल करायला हवं असं त्यांना सुचवायचं आहे. समाज याला कधी तयार होईल हे कुणीच सांगू शकत नाही.
या लेखाच्या निमित्ताने इतकं सांगता येईल की कुठे असहाय, दैन्यानं पिचून गेलेल्या, दुर्मुखलेल्या अवस्थेतली बाई, पोर दिसल्यावर त्यांना काही मदत करता येते का किंवा त्यांची मजबुरी काय आहे इतके तरी जाणून घेतले पाहिजे अशी मानसिकता आपल्या ठायी हवी ! रस्त्यावर झोपलेल्या संगीताला पाहून डिना ब्रेनेटच्या काळजात कालवलं नसतं तर कदाचित भविष्यात जुमा आणि जस्मीन या देखील आपल्या आईप्रमाणेच धंद्याला लागल्या असत्या. उर्मिला बासूसारख्या दुर्गा आहेत म्हणून संगीतासारख्या स्त्रियांना मनासारखं जगता तरी येतं हे कुणी नाकारू शकणार नाही. दुर्गा सर्वत्र आहे, तिला कुठं आणि कसं शोधायचं हे आपल्या हातात आहे. आणि दुर्दैवाने आपल्याला त्याचाच विसर पडला आहे. जस्मीन, संगीता आणि उर्मिला बासूंना वंदन! मी त्यांच्यात दुर्गेला पाहतो!आपण ज्या परिघात जगतो त्याच्या कक्षेबाहेरील जगात आणखी एक विश्व नांदत असतं ज्याची आपल्याला शून्य खबरबात असते. हे विश्व बहिष्कृत असतं, आपल्या तिरस्काराने ग्रासलेले असतं! हे विश्व आपल्याला दृष्टीसमोर नकोसे असतं, इथल्या दुनियेत चालणारे शोषण आपल्याला थोडेफार ठाऊक असतं तरीही आपण मौन राहतो नि हे चालणारच, यात गैर ते काय या भ्रमात आपण जगत असतो. खरेतर आपण अगदीच स्वकोशात गुरफटून दंग झालेले कमालीचे स्वार्थी नि आत्मकेंद्री जीव आहोत, आपल्या संवेदना बोथट झाल्यात. आपल्याला सारं माहिती असतं तरीही आपण डोळ्यांवर झापड आणून मुकाट राहतो. किंबहुना म्हणूनच आपल्या परिघाबाहेरचं हे बदनाम विश्व असंच बिनदिक्कत चालू राहिलं तरी आपली तक्रार नसते, आपली एक प्रकारची मूक सहमती असते कारण याचे थोडेफार लाभार्थी आपल्यातलेच काही अधम असतात! मानवी शोषणाच्या इतिहासात सर्वात अग्रस्थानी असणाऱ्या आणि सामाजिक उतरंडीत सर्वात तळाशी असणाऱ्या या घटकाचे शोषण आणि दमण जुनेच आहे मात्र याच्या वेदना नित्य नव्या नि उत्तरोत्तर क्लेशदायक होत चाललेल्या आहेत. याची दखल जग घेवो न घेवो, परंतु माणूस म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाने त्यावर किमान विचार केला तरी पाहिजे! ‘यत्र नार्यस्त्य पूज्यते रमते तत्र देवता’ असे वरवर गोडगोड वाटणारे श्लोक म्हणून प्रत्यक्षात नारीला न सन्मान देणाऱ्यापैकी आपण आहोत! आपण कमालीचे बुरसटलेल्या विचारांचे पाईक आहोत, जगाने कालबाह्य ठरवलेल्या मध्ययुगीन मानसिकतेकडे आपण वेगाने चाललो आहोत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. आपण डोळे झाकून बसलो असलो तरी बाकी सारी माणसंही तशीच मुर्दाड होऊन बसली असतील असं जर आपल्याला वाटत असेल तर ते सर्वथा चुकीचे आहे, आपल्या भवतालात अशी काही संवेदनशील माणसं अजूनही तग धरून आहेत ज्यांची मानवतेवरची श्रद्धा अखंडित आहे. जे आपल्या जिवाची बाजी लावून या घटकांसाठी लढताहेत. यात पुरुष तर आहेतच मात्र काही स्त्रियांही आहेत. अशाच नवदुर्गांची ही परिचयमाला. यांच्यातलं देवत्व आपल्या दृष्टीस पडलं तर आपला माणूसधर्म अजूनही शाबित आहे असं समजायला हरकत नाही!
– समीर गायकवाड





