बार्टी पीएच.डी. फेलोशिपच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णयाचे आश्वासन; सामाजिक न्यायमंत्र्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश आमरण उपोषणाचा आठवा दिवस
मनीषाताई गवळी आणि प्रतीक पंचशील यांची प्रकृती चिंताजनक

आम्ही भारतीय, साप्ताहिक
– दिनेश बोधिराज
छत्रपती संभाजीनगर | १६ ऑक्टोबर २०२६ : बार्टी पीएच.डी. फेलोशिप २०२३, २०२४ आणि २०२५ संदर्भातील विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य पी एच.डी. संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या वतीने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची त्यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले. या मागण्यांबाबत सामाजिक न्यायमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती समितीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिली आहे. आमरण उपोषणाचा आठवा, तर धरणे आंदोलनाचा अठरावा दिवस बार्टी पीएच.डी. फेलोशिपच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आमरण उपोषणाचा आठवा आणि धरणे आंदोलनाचा अठरावा दिवस पूर्ण झाला. आंदोलनादरम्यान मनीषाताई गवळी आणि प्रतीक पंचशील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समितीने म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या सामाजिक न्यायमंत्र्यांना सादर केलेल्या निवेदनात बार्टी पीएच.डी. फेलोशिप २०२३, २०२४ आणि २०२५ संदर्भातील विद्यार्थ्यांच्या अडचणी मांडण्यात आल्या. त्यामध्ये पुढील प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
१. अर्जासाठी मुदतवाढ:
पीएच.डी. फेलोशिप अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देऊन विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संधी उपलब्ध करून द्यावी.
२. वयोमर्यादेची अट रद्द करावी:
फेलोशिपसाठी लागू करण्यात आलेली वयोमर्यादेची अट रद्द करून पात्र संशोधक विद्यार्थ्यांना संधी द्यावी.
३.पदव्युत्तर गुणांची अट शिथिल करावी:
अर्ज भरताना पदव्युत्तर पदवीतील बी-प्लस (B+) गुणश्रेणी ग्राह्य धरावी. तसेच यूजीसीच्या नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के गुणांची पात्रता लागू करण्याची मागणी करण्यात आली.
४. जाचक निकष व अटी दूर कराव्यात:
फेलोशिप प्रक्रियेतील विद्यार्थ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या जाचक अटी व निकष दूर करून संशोधक विद्यार्थ्यांना न्याय द्यावा. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क विद्यार्थ्यांच्या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी बार्टीच्या महासंचालक दीपा मुधोळ आणि महाराष्ट्र शासनाचे सचिव हर्षदीप कांबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. या प्रकरणात लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचे समितीने सांगितले. मंत्र्यांनी घेतलेल्या सकारात्मक भूमिकेमुळे विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. शिष्टमंडळात संशोधक विद्यार्थ्यांचा सहभाग माजी पोलीस सहायक आयुक्त मिलिंद गायकवाड आणि दैनिक महाराष्ट्र मिशनचे संपादक नरसिंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधक विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात जयश्रीताई व्हाऊल, सुरेखाताई वासनिक, यशवंत लांडगे, प्रवीण खंदारे, दीपक घोडेस्वार आणि संदीप जाधव यांचा समावेश होता. बार्टी पीएच.डी. फेलोशिपच्या प्रश्नावर शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा आणि आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तातडीने ठोस निर्णय घ्यावा, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य पीएच.डी. संशोधक विद्यार्थी संघर्ष कृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात मांडली आहे.



