पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रा. विजय मोहिते लिखित ग्रंथातील प्रा. आनंद देवडेकर यांची प्रस्तावना
पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पुढे काय?' हे प्रकरण वाचकांना पालिभाषेचा विकास आणि प्रकल्प नियोजनासाठी विचार प्रवृत्त करील असा मला विश्वास वाटतो - प्रा. आनंद देवडेकर

प्रस्तावना
काही हजार वर्षांचा इतिहास असलेला भारतीय उपखंड आज जरी वेगवेगळ्या राष्ट्रांत विभागलेला दिसत असला तरी इतिहास काळात एकच एक असा तो जम्बूद्वीप होता. नैसर्गिक साधन संपदा आणि मानवी वास्तव्यास पूरक अशा भौगोलिक वातावरणाच्या आकर्षणानं भारतीय उपखंडावर प्राचीन काळात रानटी अवस्थेतील अनेक टोळ्यांची आक्रमणं झाली. तद्वतच मध्ययुगीन काळात या उपखंडानं धर्मवेड्यांची आक्रमणंही झेलली. काळाच्या ओघात जीत आणि जेते यांच्यात संकर झाला असला तरी धार्मिक आणि वांशिक मुद्यांवर मात्र संस्कृती संघर्ष होतच राहिला. परिणामी भारतीय उपखंडाची शकलं उडून नवीन देश अनब राष्ट्र उदयाला आली तरी संस्कृती संघर्ष मात्र थांबला नाही.
संस्कृती संघर्षांच्या या आदीम इतिहासाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक काळात आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवून सर्वसमावेशक अशा नवस्वतंत्र भारताला आकार देणाऱ्या शिल्पकाराचं नाव आहे डॉ. बाबासाहेब आंबेडकर. विविधतेनं फाटलेल्या नवस्वतंत्र राष्ट्राला स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांच्या अधिष्ठानावर एकत्वाच्या धाग्यात गुंफणारं संविधान सादर करताना बाबासाहेबांनी संविधान सभेत अभिमानानं उद्धृत केलं ते ही तत्त्वप्रणाली जगाला सर्वप्रथम प्रदान करणाऱ्या बौद्ध धम्माला. या देशाच्या संस्कृती संघर्षाच्या इतिहासात नेहमीच विषमतासमर्थक प्रवृत्तीच्या रडारवर असलेल्या बौद्ध तत्त्वज्ञानाला संवैधानिक चौकटीच्या कोंदणात बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एकप्रकारे नवस्वतंत्र भारताच्या भावी वाटचालीचं सूतोवाच केलं असं म्हटलं तर अतिशयोक्तीचं वाटू नये.
प्रा. विजय मोहिते लिखित ‘पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या पुस्तकाकडे या देशातील संस्कृतीसंघर्षाचा ऐतिहासिक घटनाक्रम लक्षात घेऊन पाहायला हवं. तसं ते पाहिल्यास दुर्लक्षित अशा पालि भाषेसाठी डॉ. बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक घेतलेल्या मेहनतीचं महत्त्व वाचकांच्या लक्षात येईल.
पालि भाषेशी संबंधित डॉ. बाबासाहेब आंबेडकर रायटिंग्ज अँड स्पीचेस, खंड १६ च्या संपादकीयात वसंत मून लिहितात “the Pali language is an indispensable key to unlock the secrets of Buddhist India” अर्थात “पालि भाषा ही बौद्ध भारताची गुपिते उकलण्यासाठी अत्यावश्यक अशी चावी आहे”. पालि साहित्याचे गाढे अभ्यासक भरतसिंह उपाध्याय ‘पाली साहित्य का इतिहास’ या आपल्या ग्रंथात म्हणतात की, ‘संपूर्ण त्रिपिटकात पालि शब्द आढळत नाही. पाली शब्दाचा पहिला प्रयोग चौथ्या पाचव्या शतकात होऊन गेलेल्या आचार्य बुद्धघोषांच्या ‘अठ्ठकथा आणि त्यांच्या विसुद्धिमग्ग’ ग्रंथात सापडतो’.
अर्थात पाली शब्द संपूर्ण त्रिपिटकात आढळत नसला तरी ‘पालि शब्द का प्रयोग केवल मूल त्रिपिटक के लिए आता है; जैसे दीघनिकाय पालि, उदान पालि इत्यादि ।’ असं पाली – महाव्याकरणकर्ते भिक्षु जगदीश कश्यप यांनी म्हटलं आहे.
त्रिपिटकात ‘परियाय’ हा शब्द अनेकदा आला असून त्याचा अर्थ बुद्धोपदेश असा आहे. उदा. भगवता अनेक परियायेन धम्मो पकासितो। अर्थात भगवंतानी अनेक उपदेशांनी धम्म प्रकाशित केला. या ‘परियाय’ चाच पुढे पलियाय असा अपभ्रंश झाला. भिक्षु जगदीश कश्यप यांनी भाब्रू येथील मूळ शिलालेखाचं पालि रुपांतर केलं आहे ते असं-
‘पियदसि लाजा मागधं संघ अभिवादनं आह, अप्पावाधतं च फासुविहारतं च। विदितं वो भन्ते ! यावतको अम्हाकं बुद्धस्मिं, धम्मस्मिं, संघस्मिं गारवो च पसादो च। यो कोचि भन्ते ! भगवता बुद्धेन भासितो (धम्मपलियायो) सब्बो सो सुभासितो एव। यो तु खो भन्ते अम्हेहि देसेय्यो, हेवं सद्धम्मो चिरद्वितिको हेस्सतीति अरहामि अहं तं वत्तवे।
‘याचा भावार्थ असा की, प्रियदर्शी राजा मगधच्या संघाला अभिवादन करतो. त्याप्रमाणेच त्यांच्या कुशल मंगलाची इच्छा करतो. भन्ते आपल्याला ज्ञात असेलच की बुद्ध, धम्म आणि संघाच्या प्रति माझ्या हृदयात किती आदर आणि श्रद्धा आहे. भन्ते, भगवंतानी जे काही सांगितलं (उपदेश) केला आहे ते सर्वकाही सुंदरच सांगितलं आहे. भन्ते जे काही मला सांगायचं आहे ते मी सांगतो ज्यामुळे सद्धम्म चिरस्थायी होईल.
पलियाय म्हणजे बुद्धोपदेश. या पलियायचा पालियाय झाला अन् पालियायचा संक्षेप पाली झाल्याचे मत भिक्षु जगदीश कश्यप यांनी आपल्या ‘पालि महाव्याकरण’ या ग्रंथात व्यक्त केलं आहे.
ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकात जनसामान्यांची भाषा असलेली मागधी भाषा चराचर सृष्टीविषयीच्या करुणेनं ओथंबलेल्या बुद्धवाणीची वाहक झाली, रक्षक झाली. ‘पा-पालेति रक्खतीति पाली’ जी पालन करते, रक्षण करते ती पाली. या अर्थानं तथागतांच्या मंगल वाणीनं संस्कारीत झालेली मागधी भाषा बुद्धवाणीचं पालन आणि रक्षण करणारी पाली भाषा म्हणून प्रतिष्ठीत झाली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पाली व्याकरण या ग्रंथाचे अनुवादक बौद्ध साहित्यिक गौतम शिंदे या संदर्भात म्हणतात, ‘एका महापुरुषाच्या वचनांसाठी एका भाषेला नाव मिळावे, ही जगातील अनन्यसाधारण घटना आहे !’ तर डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन आपल्या ‘३१ दिन में आवश्यक पाली’ या ग्रंथात सार्थपणे म्हणतात, ‘पाली भाषा की यह विशेषता है की उस मे केवल बौद्ध वायय ही सुलभ है, वहाँ अबौद्ध कुछ भी नही है।
‘तथागत भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर चक्रवर्ती सम्राट अशोकाच्या कारकीर्दीपर्यंत झालेल्या तीन धम्मसंगीतीमध्ये अर्हत आणि विद्वान भिक्षूच्या विचारमंथनातून तथागतांची शिकवण अनुक्रमे विनय पिटक, सुत्त पिटक व अभिधम्म पिटकात संकलित झाली आणि तिन्हींचे मिळून पालि त्रिपिटक अस्तित्वात आलं. पुढे इ.स. पूर्व पहिल्या शतकात श्रीलंकेचा राजा वट्टगामिणीच्या काळात ते लिपीबद्ध झालं.
‘भाषाकोविद’ असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जगातील दहा भाषाअवगत असल्याचं लेखक विजय मोहिते यांनी या पुस्तकात नमूद केलं आहे. या भाषापैकी पालि भाषेकडे बाबासाहेबांनी विशेषत्वानं लक्ष दिलं आहे. याची सरणी लावतांना बाबासाहेबांच्या मुक्ती लढ्याचं डोळस आकलन आवश्यक आहे. हा लढा या देशातील सनातन अशा संस्कृती संघर्षाचं आधुनिक रुपडं असलं तरी बाबासाहेबांचा मुक्तीलढा द्वेष मत्सरावर आधारित नव्हता. या मुक्तीलढ्यात शत्रुत्व वा सूड भावनेला थारा नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्तीलढ्याला तथागतांच्या करुणेची झालर होती. परिणामी नवस्वतंत्र भारताला समताधिष्ठीत राष्ट्राचे आयाम देताना व्यवस्था परिवर्तनासाठी बाबासाहेबांना बुद्ध विचारांविषयी ममत्व वाटणं स्वाभाविक होतं. संस्कृती संघर्षात ठरवून नामशेष केल्या गेलेल्या या भाषेचं शास्त्रशुद्ध अध्ययन होऊन या भाषेतील ज्ञानभांडार सर्वसामान्यांना खुलं व्हावंच परंतु ते समताधिष्ठीत सामाजिक पुनर्बाधणीस पोषक ठरावं हेही त्यांचं उद्दिष्ट असल्याचं ध्वनित होतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह केलेला बौद्ध धम्म स्वीकार आणि भारत बौद्धमय करण्याची त्यांची घोषणा या अंगानं विचार करता या युगप्रवर्तनाची पूर्वतयारी म्हणूनही बाबासाहेबांनी पालि भाषेच्या संवर्धनासाठी घेतलेल्या कष्टाकडे पाहाता येईल.
या पुस्तकात शीर्षक लेखासह एकूण आठ लेख आहेत. ‘पालि साहित्याचा भारतीय भाषांत अनुवाद’ या लेखात पालिभाषेतील साहित्य इतर भाषांत अनुवादित करणाऱ्या लेखकांची माहिती आहे. आंबेडकरपूर्व कालखंडात पालि भाषेसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या महनीय लेखकांची माहिती झापडबंद वाचकांचा दृष्टिकोन विकसित करण्यास पूरक ठरावी. ‘पाली भाषेला अभिजात भाषेचा दर्जा पुढे काय?’ हे प्रकरण वाचकांना पालिभाषेचा विकास आणि प्रकल्प नियोजनासाठी विचार प्रवृत्त करील असा मला विश्वास वाटतो. तर ‘धम्मलिपी आणि पालि भाषा’ यांचा अन्वय स्पष्ट करणारं प्रकरणही भाषेसोबतच धम्मलिपी आत्मसात करण्यासाठी प्रेरक ठरेल.
प्रा. विजय मोहिते हे एक चांगले वक्ते म्हणून लोकांना सुपरिचित आहेत. त्यामुळं विषय प्रतिपादनाच्या ओघात त्यांच्यातील वक्त्याने त्यांच्यातील लेखकावर मात केली असल्याचं हे पुस्तक वाचताना जाणवतं. पाली भाषेचे तरुण प्राध्यापक आणि जाणकार अभ्यासक म्हणून त्यांच्याकडून वाचकांच्या अपेक्षा आहेत. सर्व प्रकारच्या न्यूनतेवर मात करून तर्कशुद्ध, मुद्देसूद मांडणी करणाऱ्या सशक्त लेखकाच्या शक्यता त्यांच्या व्यक्तिमत्त्वात आहेत. त्यासाठी सदिच्छा !
– प्रा. आनंद देवडेकर संपादक सद्धम्म पत्रिका, पाली भाषा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथातून साभार



