४२ वर्षांचा विक्रम मोडत विथ्या रामराजची ऐतिहासिक भरारी!
पी. टी. उषांचा विक्रम मागे; भारतासाठी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य अशी पदकांची ऐतिहासिक कमाई

आम्ही भारतीय / साप्ताहिक
मुंबई / प्रतिनिधी : भारतीय ॲथलेटिक्स इतिहासातील तब्बल ४२ वर्षे अबाधित राहिलेला राष्ट्रीय विक्रम अखेर मोडीत निघाला आणि त्या विक्रमाच्या नव्या शिलेदार ठरल्या तामिळनाडूच्या विथ्या रामराज. जपानमधील अयची-नागोया येथे सुरू असलेल्या २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्या यांनी महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५४.७५ सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावले. त्याच वेळी त्यांनी महान धावपटू पी. टी. उषा यांनी १९८४ मध्ये नोंदवलेला ५५.४२ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम ०.६७ सेकंदांनी मागे टाकला. मात्र विथ्या रामराज यांच्या नागोया मोहिमेची कहाणी केवळ एका विक्रमापुरती मर्यादित नाही. त्यांनी या स्पर्धेत महिलांच्या ४×४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदक, मिश्र ४×४०० मीटर रिलेमध्ये रौप्यपदक आणि महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक अशी तीन पदके जिंकून आपल्या कामगिरीवर सुवर्णाक्षरांनी शिक्का मोर्तब केले. ४२ वर्षांचा विक्रम अखेर इतिहास जमापी. टी. उषा यांनी १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिक मध्ये महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवली होती. हा विक्रम भारतीय अॅथलेटिक्समध्ये सर्वाधिक काळ टिकलेल्या राष्ट्रीय विक्रमांपैकी एक ठरला आहे. २०२३ च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्या रामराज यांनी याच वेळेची म्हणजे ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवत उषांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्या स्पर्धेत त्यांनी कांस्यपदकही जिंकले होते. त्यामुळे पुढील तीन वर्षे एकच प्रश्न भारतीय क्रीडा विश्वासमोर होता तो म्हणजे विथ्या हा विक्रम कधी मोडणार? नागोयातील २०२६ च्या अंतिम फेरीत या प्रश्नाचे उत्तर मिळाले. ५४.७५ सेकंद! या वेळेसह विथ्या यांनी केवळ स्वतःची सर्वोत्तम कामगिरी केली नाही, तर भारताच्या अॅथलेटिक्सच्या विक्रम पुस्तकातील एका प्रदीर्घ अध्यायालाच पूर्णविराम दिला. त्या महिलांच्या ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५५ सेकंदांच्या खाली धावणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या. या शर्यतीत संयुक्त अरब अमिरातीच्या मरियम करीम यांनी ५४.३१ सेकंदांसह सुवर्ण, तर कझाकस्तानच्या अॅडेलिना झेम्स यांनी ५४.५८ सेकंदांसह रौप्यपदक जिंकले. विथ्या यांनी ५४.७५ सेकंदांसह कांस्यपदक मिळवले.
पदकांचा ‘हॅट्ट्रिक’!
नागोया आशियाई क्रीडा स्पर्धा विथ्या यांच्या कारकिर्दीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरली. महिलांची ४×४०० मीटर रिले – सुवर्णपदक भारतीय महिला संघाने ३ मिनिटे २९.६९ सेकंदांत शर्यत पूर्ण करून सुवर्णपदक मिळवले. विथ्या यांनी अंतिम टप्प्यात धावताना भारताला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने बहरीनला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. मिश्र ४×४०० मीटर रिले – रौप्यपदक विथ्या यांच्या दमदार कामगिरीमुळे भारताच्या मिश्र रिले संघानेही रौप्यपदक मिळवले. त्यामुळे वैयक्तिक ४०० मीटर अडथळा शर्यतीतील कांस्यासोबत त्यांच्या खात्यात आणखी दोन पदके जमा झाली. ४०० मीटर अडथळा – कांस्य आणि राष्ट्रीय विक्रम सर्वात महत्त्वाचे म्हणजे ५४.७५ सेकंदांची वेळ. हे कांस्यपदक जितके महत्त्वाचे आहे, तितकाच महत्त्वाचा त्यामागचा राष्ट्रीय विक्रम आहे. साध्या कुटुंबातून आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्सच्या शिखराकडे विथ्या रामराज यांचा प्रवास अत्यंत संघर्षमय आहे. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९९८ रोजी झाला. त्या कोयंबतूर परिसरातील साध्या कुटुंबातून पुढे आल्या. त्यांचे वडील ट्रकचालक म्हणून काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. विथ्या आणि त्यांची जुळी बहीण निथ्या रामराज या दोघींनी अॅथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खेळाच्या महागड्या प्रशिक्षणासाठी अनुकूल नव्हती. शाळेतील शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकांनी दोन्ही बहिणींमधील क्रीडागुण ओळखले. त्यानंतर त्यांच्या आईने त्यांना अॅथलेटिक्सकडे वळवले आणि दोघींना इरोड येथील स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये दाखल केले. या वसतिगृहामुळे त्यांच्या प्रशिक्षणाचा आणि राहण्याचा काही खर्च वडिलांचा त्याग आणि दोन बहिणींचे स्वप्न विथ्या यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा मोठा त्याग आहे. वडील ट्रक चालवून घर चालवत होते आणि मुलींच्या प्रशिक्षणासाठी आवश्यक आर्थिक जबाबदारी पेलत होते. त्यांनी अनेकदा अतिरिक्त काम करून मुलींच्या क्रीडा कारकिर्दीला आर्थिक पाठबळ दिले. विथ्या यांनी आपल्या वडिलांच्या या त्यागाची जाणीव कायम ठेवली. त्यांच्या कारकिर्दीतील भावनिक क्षणांपैकी एक म्हणजे आपल्या वडिलांना ट्रक चालवण्याचे काम सोडता यावे, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

विथ्या यांनी यापूर्वी दिलेल्या मुलाखतीतही कुटुंबाला प्रशिक्षणाचा खर्च परवडत नसल्यामुळे स्पोर्ट्स हॉस्टेलची मदत महत्त्वाची ठरल्याचे सांगितले होते. विथ्या यांनी पुढे क्रीडा कोट्यातून BBA चे शिक्षण घेतले आणि २०१८ मध्ये पटियाला येथील राष्ट्रीय शिबिरात प्रवेश केला. मात्र त्यांच्या कारकिर्दीत अनेक अडथळेही आले. प्रशिक्षणातील अडचणी, कोविड-१९ चा संसर्ग आणि अपेंडिक्सची शस्त्रक्रिया यामुळे त्यांच्या तयारीवर परिणाम झाला. २०२२ मध्ये चेन्नईला स्थलांतर केल्यानंतर त्यांच्या प्रशिक्षणाला नवी दिशा मिळाली. त्यांची जुळी बहीण निथ्या स्वतःही अॅथलीट असून २०२३ मध्ये दोन्ही बहिणींनी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जुळ्या बहिणींच्या जोडीच्या रूपात विशेष लक्ष वेधले. वडिलांचा त्याग, मुलीचे स्वप्न विथ्या यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाच्या त्यागाची मोठी भूमिका आहे. अलीकडील मुलाखतीत विथ्या यांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक रनिंग स्पाइक्स घेण्यासाठी वडिलांनी अनेकदा स्वतःच्या गरजा बाजूला ठेवल्या, अगदी काही वेळा जेवण टाळून पैसे वाचवल्याची आठवण सांगितली. त्यांचे वडील दुसऱ्याच्या मालकीचा ट्रक चालवत असल्याने उत्पन्न मर्यादित होते. म्हणूनच नागोयातील प्रत्येक पदकामागे केवळ एका धावपटूची मेहनत नाही; त्यामागे एका कुटुंबाचा दीर्घ संघर्ष, आई-वडिलांचा त्याग, जुळ्या बहिणीचे सहकार्य आणि अनेक वर्षांचे कठोर प्रशिक्षण आहे.

२०१८ मध्ये त्या पटियाला येथील राष्ट्रीय कॅम्पशी जोडल्या गेल्या. मात्र सुरुवातीचा प्रवास अपेक्षेइतका सरळ नव्हता. प्रशिक्षणातील अडचणी, वैयक्तिक प्रशिक्षणाचा अभाव, अन्नाची अडचण आणि हिंदी भाषेची अपरिचितता यामुळे त्यांना संघर्ष करावा लागला. टोकियो ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेच्या तयारीदरम्यान त्यांना कोविडचा संसर्ग झाला आणि त्यानंतर अपेंडिक्सची शस्त्रक्रियाही करावी लागली. त्यामुळे त्यांची तयारी विस्कळीत झाली आणि त्यांना कॅम्प सोडून घरी परतावे लागले. ४०० मीटरपासून अडथळा शर्यतीकडेविथ्या यांनी सुरुवातीला प्रामुख्याने ४०० मीटर सपाट शर्यतीवर लक्ष केंद्रित केले होते. मात्र २०२२च्या आसपास त्यांच्या जुळ्या बहिणी निथ्याच्या माध्यमातून प्रशिक्षक नेहपाल सिंह राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रशिक्षणाचा नवा टप्पा सुरू झाला. प्रशिक्षकांनी विथ्या यांच्यातील अडथळा शर्यतीची क्षमता ओळखली आणि त्यांना ४०० मीटर अडथळा शर्यतीकडे अधिक गांभीर्याने वळवले. त्याच काळात पी. टी. उषांचा प्रदीर्घ राष्ट्रीय विक्रम मोडण्याचे लक्ष्य त्यांच्या प्रशिक्षणाचा भाग बनले.
हांगझोऊ २०२३ :
विक्रमाशी बरोबरी२०२३च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत विथ्या यांनी ४०० मीटर अडथळा शर्यतीत ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवली. हीच वेळ पी. टी. उषांनी १९८४ मध्ये नोंदवली होती. विथ्या यांनी विक्रम मोडला नव्हता, पण तब्बल चार दशकांहून अधिक काळ टिकलेल्या विक्रमाशी बरोबरी केली होती. त्याच स्पर्धेत त्यांनी महिलांच्या आणि मिश्र ४×४०० मीटर रिलेमध्येही पदके जिंकली. पॅरिस ऑलिम्पिक आणि पुढचा प्रवास हांगझोऊनंतर विथ्या यांच्या कारकिर्दीला आंतरराष्ट्रीय पातळीवर आणखी वेग आला. त्यांनी पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमध्ये भारताच्या महिलांच्या ४×४०० मीटर रिले संघाचे प्रतिनिधित्व केले. २०२५च्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतही त्यांनी ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्यपदक मिळवले. त्यामुळे २०२६च्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी त्यांचा आंतरराष्ट्रीय अनुभव मोठ्या प्रमाणावर वाढला होता. विक्रम मोडल्यानंतर विथ्यांचा संदेशनागोयातील विक्रमी कामगिरीनंतर विथ्या यांनी वयाकडे पाहून स्वप्नांची मर्यादा आखू नका, असा संदेश दिला. त्यांनी सांगितले की, २०२३मध्ये विक्रमाशी बरोबरी केल्यानंतर सतत “तो विक्रम कधी मोडणार?” असा प्रश्न विचारला जात होता. अखेर २०२६मध्ये त्यांनी ५४ सेकंदांच्या वेळेत धावत त्या अपेक्षेला उत्तर दिले. त्यांची कामगिरी केवळ एका जुन्या विक्रमाचा अंत नाही; त प्रशिक्षण, सातत्य, कुटुंबाचा त्याग आणि अपयशानंतर पुन्हा उभे राहण्याच्या जिद्दीची कहाणी आहे.
‘उषा ते विथ्या’ भारतीय अॅथलेटिक्समधील एका पिढीचा प्रवास १९८४ मध्ये पी. टी. उषांनी ५५.४२ सेकंदांची वेळ नोंदवली. २०२३ मध्ये विथ्या रामराज यांनी त्याच वेळेशी बरोबरी केली. आणि २०२६ मध्ये त्यांनी ५४.७५ सेकंदांची वेळ नोंदवत तो विक्रम स्वतःच्या नावावर केला. हा केवळ आकड्यांचा बदल नाही. हा भारतीय महिला अॅथलेटिक्समध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे विक्रमाची मशाल जाण्याचा क्षण आहे. पी. टी. उषांनीही विथ्या यांच्या कामगिरीचे स्वागत करत विक्रम मोडले जाणे हेच खेळाचे सौंदर्य असल्याचे म्हटले.
२०२३ हांगझोऊ आशियाई स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य
२०२३ रोजी ५५.४२ सेकंद पी. टी. उषांच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी
२०२४ रोजी पॅरिस ऑलिम्पिक भारताच्या महिला ४×४०० मीटर रिले संघात सहभाग
२०२५ आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत कांस्य
२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेत ४०० मीटर अडथळा कांस्य व ५४.७५ सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम
२०२६ महिलांची ४×४०० मीटर रिले सुवर्णपदक
२०२६ मिश्र ४×४०० मीटर रिले रौप्यपदक विशेष नोंद :
World Athletics च्या प्रोफाइलनुसार विथ्या यांचा जन्म २० सप्टेंबर १९९८ रोजी झाला असून ४०० मीटर अडथळा शर्यतीतील त्यांची ५४.७५ सेकंदांची २०२६ कामगिरी ही त्यांच्या आधीच्या ५५.४२ सेकंदांच्या राष्ट्रीय विक्रमापेक्षा स्पष्ट सुधारणा आहे. “वडिलांचा ट्रक, आईचा विश्वास, बहिणीची साथ आणि स्वतःची धावण्याची जिद्द” या प्रवासातून विथ्या रामराज आज भारतीय अॅथलेटिक्सच्या इतिहासात नवे पान लिहिले आहे. पी. टी. उषांचा ४२ वर्षांचा विक्रम मोडताना विथ्या यांनी केवळ घड्याळातील वेळ बदलली नाही; त्यांनी पुढील पिढीतील भारतीय महिला धावपटूंना एक नवा मापदंड दिला आहे.



