चळवळसामाजिक

सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ ता. मोहोळ येथे दोन गटांत झालेल्या जातीय हाणामारीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत कलम ३०७ अंतर्गत गुन्हा आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे

दोन गटांत झालेल्या जातीय हाणामारीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या घटनेत एका लष्करी जवानावर सत्तूरने प्राणघातक हल्ला करण्यात आला, तसेच घरांची तोडफोड व दगडफेक करण्यात आली. या गंभीर घटनेनंतर गावात मोठा जातीय तणाव निर्माण झाला होता

आम्ही भारतीय,साप्ताहिक

विशेष प्रतिनिधी / सोलापूर

सोलापुर : मोहोळ तालुक्यातील शेटफळ गावात जवानावर सत्तूरने वार करत 100 जणांचा जमाव रस्त्यावर आला. शेटफळमध्ये किरकोळ वादाला जातीय तणावाची किनार मिळाल्यानंतर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जवानावर प्राणघातक हल्ल्यापासून घरांवर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या घटनांमुळे गावात तणाव निर्माण झाला असून, दोन्ही बाजूंनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. जवानासह दोन्ही गटांतील अनेक जण गंभीर जखमी झाले असून घरांवर हल्ला झाला आहे. पूर्ववैमनस्य, धार्मिक प्रथा आणि शेळ्या शेतात गेल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या संघर्षात भारतीय सैन्यातील एका जवानासह दोन्ही बाजूंचे अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर गावात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जवानावर सत्तूरने हल्ला २३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास राजमाता दूध संकलन केंद्रासमोर पहिली घटना घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शेळ्या चरण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर भारतीय सैन्यातील जवान सुमित उत्तरेश्वर खडके आणि त्यांचे चुलत भाऊ राम वसंत खडके दूध संकलन केंद्रावर गेले होते. यावेळी काही जणांनी त्यांना घेरून मारहाण केल्याचा आरोप आहे. तक्रारीनुसार, सुमित खडके यांच्या डोक्यावर सत्तूरने वार करण्यात आला. राम खडके यांनाही मारहाण झाली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या व्यक्तींवरही हवेच्या पंपाने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. रोकड आणि सोन्याची साखळी हिसकावल्याचा आरोप हाणामारीदरम्यान राम खडके यांच्या खिशातील ११ हजार रुपये तसेच सुरज खडके यांच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची साखळी जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राम खडके यांच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या दिवशी जमावाचा घरांवर हल्लादरम्यान, ऑगस्ट महिन्यातील श्रावण सोमवारी सिद्धेश्वर मंदिरातील पादुकांना हार घालण्यावरून वाद झाल्याची पार्श्वभूमी असल्याचे सांगण्यात येते. याच पूर्व वैमनस्यातून २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास परिस्थिती पुन्हा चिघळली. भीमनगर परिसरात १०० हून अधिक लोकांचा जमाव जमल्याचा आरोप आहे. पोलिस बंदोबस्त असतानाही जमावाने अरविंद सिद्धेश्वर थोरात यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी पाइप आणि काठ्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. अ‍ॅट्रॉसिटीसह खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा अरविंद थोरात यांच्या डोक्यावर लोखंडी पाइपने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. याशिवाय परिसरातील इतर घरांमध्येही तोडफोड आणि मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी ३६ नामनिर्देशित व्यक्ती आणि १०० हून अधिक अनोळखी व्यक्तींविरोधात खुनाचा प्रयत्न, दंगल आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावात तणावपूर्ण शांतताघटनेनंतर प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांनी शेटफळमध्ये भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. प्रांताधिकारी सचिन इथापे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप, सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे आणि पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी गावात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शांतता राखावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सूरज जगताप करत आहेत.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!