गौरव मोरे यांच्या घरी अभिनेते जॉनी लिव्हर यांची सदिच्छा भेट
गौरव मोरे आणि जॉनी लिव्हर यांच्या या संस्मरणीय भेटीचे सर्वत्र कौतुक

आम्ही भारतीय / साप्ताहिक / डिजिटल :मराठी अभिनेता आणि विनोदी कलाकार गौरव मोरे यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण केली आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला चाहत्यांशी संवाद साधताना ते पावसाचा उल्लेख करत म्हणतात, “आज निसर्गाने मला एक मोठं सरप्राईज दिलं आहे. माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाची घटना घडणार आहे. सरप्राईज मला आहे आणि सरप्राईज तुम्हालाही आहे. हे सत्यात उतरण्यासाठी मी काहीतरी पुण्य केलं असावं; ते पुण्य याच जन्मी फळाला आलं आहे.” असे म्हणत त्यांनी चाहत्यांकडे केवळ दोन मिनिटांचा अवधी मागितला. त्यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते जॉनी लिव्हर यांचा घरामध्ये प्रवेश होतो. नंतर गौरव मोरे जॉनी लिव्हर यांना गळा भेट घेत,जॉनी लिव्हर गौरव मोरे याच्या पाठीवर हाताने पाठ थोपटतात. पुढे गौरव मोरे याचा जॉनी लिव्हर यांच्या प्रति असलेला आदरभाव आणि स्वागत करताना दिसून आलेला नम्र भाव सर्वांना भावला.

या भेटीदरम्यान गौरव मोरे यांच्या चेहऱ्यावर दिसलेला आदरभाव, नम्रता आणि आपल्या आदर्श कलाकाराविषयीची आत्मीयता पाहून चाहत्यांचे मन जिंकले. सोशल मीडियावर या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया देत गौरव मोरे यांचे कौतुक केले. “भावा, जिंकलास!”, “तुझं स्वप्न पूर्ण झालं”, “अभिमान वाटतो” अशा प्रतिक्रिया देत चाहत्यांनी त्यांचे मनोबल वाढवले.
हा भावनिक आणि प्रेरणादायी क्षण सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, गौरव मोरे आणि जॉनी लिव्हर यांच्या या संस्मरणीय भेटीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



