चळवळ

‘युथ की बात’ संवादात युवकांनी व्यक्त केली सरकारी खात्यांकडून जबाबदेही !

आपले प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी दुसऱ्यांवर अवलंबून रहाणे योग्य नाही

आम्ही भारतीय, साप्ताहिक /आकाश तपासे

ठाणे, दि. २४ ऑगस्ट “बरेच वर्षे आपण बघत आलोय – युवकांना फारसे व्यक्त व्हायला दिले जात नाही. आता त्यांना समजून घ्या”, असा सुर ‘जन गण मन अभियाना’ अंतर्गत आयोजित ‘युथ की बात’ चर्चासत्रात युवक – युवतींनी व्यक्त केला. लक्ष्य परिवर्तन व समता विचार प्रसारक संस्थेतर्फे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ठाण्यात हा युवा संवाद आयोजित केला होता. भारत जोडो अभियानाचे राजेंद्र चव्हाण, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलनाचे अजित डफले, समता विचार प्रसारक संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर आदी मान्यवर श्रोत्यांमध्ये बसून युवा की बात ऐकत होते! “सरकार कडून देशाची अपेक्षित प्रगती जेंव्हा पुरेशी होतांना दिसत नाही तेंव्हां आंदोलने होतात. जंतर मंतर आंदोलनात शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला जबाबदार म्हणून जरी मंत्र्यांचा राजीनामा मिळवण्यात यश प्राप्त झाले. मात्र अजून शिक्षण व्यवस्थासुधार होणे बाकी आहे. त्यासाठी आंदोलन सुरुच ठेवावे लागेल. कारण सरकार अनेकदा अवास्तव वा खोटे दावे करत असतात. त्या दाव्यांचा खरेपणा तपासणं आता सोपं झालं आहे. त्यामुळे सरकार आधी नीट विकास करत नाही व मग खोटे दावे करतं तेंव्हां युवक आंदोलन छेडतात! अनेकदा चांगल्या व्यवस्थेच्या आवरणाखाली चुकीच्या बाबी खपवल्या जातात. विद्यार्थ्यांना खरे सांगितले जावे. युवकांना सरकारकडून जबाबदेहीची रास्त अपेक्षा आहे! ही अपेक्षा व्यक्त करत असतांना कुणा आंदोलकाची भाषा अयोग्य वाटली तरी ती ऐकून घ्या. चुका झाल्या तर समजून सांगा. वडीलकीची ही जबाबदारीही सरकार व समाजाने पार पाडायला हवी. तरच युवा निर्भयतेने अभिव्यक्त होईल”, असे मत युवा दक्ष घार्वेने व्यक्त केले. शुभम लाड हा दुसरा महाविद्यालयीन युवक म्हणाला, “राजकारणाबाबत मी अगदी अनभिज्ञ होतो. आपलं घर, कुटुंब व अभ्यास हेच माझे जगलहोते. जंतरमंतर आंदोलनाने मला जागे केले. आपलाच पैसा सरकार वापरत असते तर त्याबाबत आपणच जागरूक रहायला हवे, हे माझ्या लक्षात आले. त्यामुळेच या आंदोलनाला पाठींबा देतांना स्वतःसाठीही मी यात उतरलो. रेल्वे स्टेशनवर आंदोलन समर्थनाचा फलक घेऊन प्रसंगी एकटा उभा राहीलो. आता युवकांनी “शाळा ठीक करा”, हे आंदोलन करण्यात काही गैर आहे का? तरीही युवकांना मारहाण, शाळा प्रवेश बंदी, त्यांच्यावर केसेस हे कशासाठी केलं जातंय? सरकारच्या कामांवर सर्व स्तरांवर लक्ष ठेवणे ही नागरिकांची जबाबदारी आहे”. अपेक्षा कांबळे या युवतीने सांगितले, “जोवर युवक बोलणार नाही, आपसात चर्चा करणार नाही तोवर एकमेकांची मदतही मिळणार नाही. युवकांनी सहकार्य वाढवून एकजुटीने समाजकार्य करत रहायला हवे. आता जागरूक मुली आंदोलनात हिरीरीने सहभागी होत आहेत. निर्भयतेने व्यक्त होत आहेत. मुली मुलांच्या बरोबरीने पुढे येणार याचे भान मुलांनी बाळगायला हवे. मुलींवरील अत्याचाराला पुरुष जबाबदार आहेत तर मुलांना समजवा. युवकांना सजग बनवा. युवतींवर बंधने लादू नका. हा नव्या युगाचा मंत्र आहे”. लक्ष्य परिवर्तनचा संयोजक व संस्थेचा एकलव्य गोरख हिवाळे म्हणाला,

“स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली. तरी आपण विशेषतः युवक व त्यातही युवती स्वतंत्र आहोत का? अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची आपल्यात हिंमत आहे का? आजकाल व्हीडीयो मॅार्फींग करून खोट्याचे खरे करून भासवतात. जो अपराध घडलाच नाही तो केल्याचा आरोप लावून; जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील उमर खालीद प्रमाणे वर्षोन् वर्षे तुरुंगात डांबवतात. मिडीया यावर गप्प बसत असेल तर आपल्यालाच सोशल मिडीयावर वापर करून सत्य सांगावे लागेल. सरकारला जाब विचारत रहाण्याची आपलीच जबाबदारी आहे”. सनिराज यादव या जर्नालिझमच्या विद्यार्थ्याने समर्पक उदाहरणातून तंत्रज्ञानाच्या वापराबाबत भाष्य केलं. “हरिश्चंद्राची फॅक्टरी या सिनेमात लोकांना रेल्वे गाडी सुरुवातीला लोखंडी राक्षस वाटला. लोकं गाडी पाहून घाबरले. रेल्वे ही आज मुंबई सारख्या शहरांची लाईफ – लाईन बनली आहे. आज आपणही एआय तंत्रज्ञानाला असेच घाबरत आहोत. तंत्रज्ञानाशी मैत्री करून युवकांनी विकास साधला पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जात. त्यामुळेच सरकारी शाळांमधील दुरावस्था आम्हांला सहन होत नाही”, असे त्यांने सांगितले. लोकवस्तीतील युवा कार्यकर्ते करण पडांगळे म्हणाले, “युवकांना आपले करीयर, रोजगार, उद्योजकता यासाठी आजचे शिक्षण पुरेसे पडत नाही. शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांना त्यासाठी सक्षम बनवण्यात कमी पडतं आहे. शिक्षणाने युवकांना प्रश्न विचारण्याची शिकवण दिली आहे का? शिक्षणाची जी चातुर्वर्ण्य व्यवस्था आहे त्या विरोधात आमची मागणी सर्वांना समान शिक्षण मिळावे, अशी आहे. जिल्हा परीषद शाळेत शिकणारा खाजगी वा खार्चिक शाळेतील शिकणाऱ्याशी निकोप स्पर्धा करू शकेल का?”किशोर जाधव या पीएचडीच्या विद्यार्थ्याने, “आपल्या शाळा कारखाने बनल्या आहेत का? शिक्षणाने आपण सक्षम बनतोय का? असे विचारत शाळांकडे लक्ष देणें आवश्यक आहे. शाळांमध्ये दप्तर, पुस्तके, गणवेश वेळेवर मिळत नाही हे लक्षात आल्यावर, त्याबाबत माहितीचा अधिकार कायदेयान्वये एक चौकशी अर्ज टाकला आणि पुढच्या आठवड्यात सर्वांना वरील साहित्य मिळालं, हा अनुभव कथन केला. युवकांनी सभोवतालच्या सरकारी आस्थापनांच्या कामावर लक्ष ठेवून, कुठे कमतरता दिसल्यास आरटीआयचा वापर करण्याची सक्रीयता दाखवणे आवश्यक आहे. आपण केवळ ‘रील्स’ मध्ये अडकून न पडता सामाजिक व शैक्षणिक प्रश्नांवर ‘रियल’ हस्तक्षेप केला पाहीजे”, असे प्रतिपादन केले. चंद्रकांत रोकडे म्हणाले, “सर्व स्तरांवरील प्रगती, स्वच्छता याबाबत निव्वळ इतर देशांची उदाहरणं देऊन उपयोगाचे नाही. आपल्या देशाचे उदाहरण देता येईल असा देश उभारण्यासाठी आपण झटायला हवे”. अस्मिता गायकवाड या एकलव्य विद्यार्थिनीने सांगितले की, “सरकारी शाळांमधील स्वच्छता हा कळीचा मुद्दा बनला आहे. तिथली स्वच्छतागृहे, मध्यान्हभोजन योजनेची स्वयंपाकघरे येथे स्वच्छता नसल्याने मुलांना संसर्गजन्य रोगांचा सामना करावा लागतो. डॅाक्टरचा खर्च वाढतो. अभ्यासावर परिणाम होतो. याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे”. रोनित भिडे या महाविद्यालयीन युवकाने, “शालेय शिक्षक व महाविद्यालयीन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे आवश्यक आहे. त्यातून विद्यार्थ्यांना आपुलकीने समजावले जाईल व तेच खरे शिक्षण आहे”, यावर भर दिला! संस्थेचा एकलव्य कार्यकर्ता अजय भोसले म्हणाला, “आपले प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी दुसऱ्यांवर अवलंबून रहाणे योग्य नाही. फीया वाढतात. रेल्वे – बस मध्ये बसायला मिळत नाही. पेट्रोल भरले तर त्यात भेसळ आढळते. अशा मुद्द्यांवर तिथल्या तिथे प्रश्न विचारण्याची धमक युवकांमध्ये असायला हवी. आम्ही कर भरतो. आम्हांला सरकारकडून जबाबदेही हवी”! कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निनाद रावराणे, अजय पटेकर, कृष्णा किर्तीकर, रुपेश गायकवाड यांनी परिश्रम घेतले.

aamhi bharatiya

Dinesh Soma Bodhiraj Editor : Aamhi Bharatiya Weekly Marathi News Paper RNI no.: MAHMAR/2022/84060 Mauli -2, Mahatma Jotirao Phule nagar -2, Railway Station Mankhurd Mumbai Maharashtra India 400088 Mobile no. 9594480134 E-mail ID : amhibharatiyaab@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!