भटक्या विमुक्त समाजाचं जीवन अतिशय खडतर म्हणजे आजही या समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी बरीच धडपड करावी लागते
‘ पोलादी बाया ‘ हे घिसाडी म्हणजे भटक्याविमुक्तातील लोहार काम करणारा समाज या समाजातील स्त्रियांची संघर्षमय कहाणी

भटक्या विमुक्त समाजाचं जीवन अतिशय खडतर म्हणजे आजही या समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी बरीच धडपड करावी लागते
अर्थार्जनाची पुरेशी साधनं नाहीत. शिक्षणाचा अभाव , दारिद्र्य आणि करावी लागणारी भटकंती या अशा असंख्य कारणांमुळे सामाजिक स्थैर्य देखील या समाजाला लाभत नाही . अशातच या समाजातील महिलांची परिस्थिती अत्यंत दयनीयच म्हणावी लागेल . मातृसत्ताकाचा वारसा सांगणाऱ्या या समाजात पुरुषसत्ताक संस्कृतीने ताबा मिळवला आहे . ऊ त्यामुळे स्त्रियांना आपल्या हक्क आणि अधिकारांची जाणीव तितकी राहिली नाही . परंतु या सर्व गोष्टींचा अपवाद म्हणजे राबून निर्मिती घडविणाऱ्या पोलादी बाया. ‘ पोलादी बाया ‘ हे घिसाडी म्हणजे भटक्याविमुक्तातील लोहार काम करणारा समाज या समाजातील स्त्रियांची संघर्षमय कहाणी . इथल्या बाया या परिकथेतल्या पात्रांसारख्या नाजूक नाहीत तर त्या पोलादाप्रमाणे टणक आणि परिस्थितीला वाकवणाऱ्या आहेत . प्रत्येक स्त्री ची कहाणी ही ऊर्जास्रोत आहे . लेखिका दिपा पवार यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जाऊन प्रत्यक्ष या महिलांची भेट घेऊन त्यांची संघर्षगाथा लिहिली आहे . लेखिका या देखील घिसाडी समाजातून असल्याने अतिशय वास्तववादी जीवनप्रवास त्यांनी या महिलांचा मांडलाय. अशा महिला या इतिहासाच्या पानांमध्ये आपल्याला कधीच दिसत नाही . त्यांची दखल घेतल्या जात नाही . या महिला कलेच्या वाहक असतात. त्यांच्या श्रमाचं मूल्य इथल्या अर्थव्यवस्थेत नगण्य मानल्या जातं . त्यांच्या श्रमाला व कलेला साहित्यात स्थान मिळवून देण्याचं मोलाचं काम लेखिका दिपा पवार यांनी ‘ पोलादी बाया ‘ या पुस्तकाच्या माध्यमातून केलेलं आहे . या पुस्तकातील महिलांची कहाणी म्हणजे अनुभव, वास्तव, दुःख, दैन्य, श्रम या सर्वांचा मिलाप होऊन निर्माण होणारी प्रेरणेची , उत्साहाची व स्वाभिमानाची धगधगती ज्वालाच म्हणावी लागेल .
- अंजना
ऐन लग्नाच्या वेळी मुलीला कळावं की तिचा होणारा आयुष्याचा जोडीदार याला काहीच दिसत नसून तो अंध आहे तेव्हा १४ वर्षाच्या मुलीवर कसं आभाळ कोसळलं असेल . ही चित्रपटाची कहाणी नाही ही आहे अंजना ची गोष्ट . भटक्या विमुक्त समाजातील असंख्य स्त्रियांची हीच विवंचना . या पुरुष प्रधान समाजाने स्त्रीला कायम दुय्यम समजलं . तिच्या आवडीनिवडी , जोडीदार निवडीचं स्वातंत्र्य यावर बंधनचं होती . अशीच बंधनं अंजनावरही होती . आपल्या होणाऱ्या जोडीदाराविषयी किंचितही माहिती नसतांना लग्नास तयार आणि त्याही पेक्षा आपला नवरा अंध आहे माहिती पडल्यावरही त्याला आपलं मानून संसार करण्याची जिद्द उराशी बाळगून अठराविश्वे दारिद्र्य भोवती असतांनाही न डगमगता आपला परंपरागत लोहार कामच्या कलेवर जीवनाची गुजराण करणं आणि संसार चालवणं हे अंजनाने केलं. - खैरून
मुस्लीम समाजातील स्त्री घिसाडी समाजातील तरुणावर प्रेम करून त्यासोबत संसार थाटते तेव्हा तिच्या वाटेला आलेला संघर्ष अतिशय कठीण असतो . खैरूनच्या जीवनातून याची भीषणता जाणवते . पण खैरून इथेच थांबत नाही . आपल्या नवऱ्याच्या पारंपरिक व्यवसायाला वाहून घेते . जीवनाच्या तडाख्याला ती आपल्या हातातल्या घनाने उत्तर देते . आपली उपजीविका चालवून स्वतःला सिद्ध करते . - मिराबाई
आपला व्यवसाय हा आपला स्वाभिमान हे ब्रीद मानून केवळ लोहार कलेच्या जोरावर आपल्या मुलांना उच्चशिक्षित करणारी मीराबाई खरचं प्रेरणेचा स्रोत आहे .
या सोबतच भिकुबाई , छायाबाई, सीताताई, अरुणा, शांताबाई यांच्या संघर्ष गाथाही आपल्याला ‘पोलादी बाया ‘ या पुस्तकात वाचायला मिळतील .
‘ पोलादी बाया ‘
लेखिका : दिपा पवार
हरीती प्रकाशन .



